कोकण, गोव्यातील कातळशिल्पे ‘युनेस्को’ च्या ‘वारसा’ यादीत | पुढारी

कोकण, गोव्यातील कातळशिल्पे ‘युनेस्को’ च्या ‘वारसा’ यादीत

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत स्थान मिळाले आहे. त्यात सिंधुदुर्गातील 18, रत्नागिरी जिल्ह्यातील आठ आणि गोव्यातील एका कातळशिल्पाचा समावेश आहे.

‘युनेस्को’चे तज्ज्ञ प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर अंतिम यादीत स्थान मिळवण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. कातळशिल्प संवर्धनासाठी प्रयत्न करणारे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. अश्मयुगीन काळापासूनची ही कातळशिल्पे प्राथमिक यादीतील स्थानामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहेत.

युनेस्कोकडून जगभरातील वारसास्थळांची यादी तयार केली जाते. गेल्या वर्षी गड-किल्ल्यांचा या यादीत समावेश झाला होता. गेल्या काही वर्षांत कोकणातील सड्यांवर कातळशिल्पांचा शोध लागला आहे. त्यामुळे वारसा स्थळांच्या यादीत समावेश होऊन कोकणातील कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून कातळशिल्पांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार युनेस्कोने जाहीर केलेल्या तात्पुरत्या यादीत या कातळशिल्पांना स्थान मिळाले आहे.

त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रुंध्ये तळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोशी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल या ठिकाणच्या कातळशिल्पांचा समावेश आहे. साधारणपणे वीस हजार वर्षे जुनी आणि तिसर्‍या शतकापर्यंतची असलेली ही कातळशिल्पे आहेत.

Back to top button