सिंधुदुर्ग : कुडाळात शिवसैनिक आक्रमक; रेशन धान्य दुकानावर धडक | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळात शिवसैनिक आक्रमक; रेशन धान्य दुकानावर धडक

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळी सणानिमित्त घोषणा केलेल्या ‘आनंदाचा शिधा किट’चे वाटप दिवाळी सुरू  झालेले नाही. अद्याप पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी रास्त (रेशन) धान्य दुकानांवर कीट पोहोचलेली नाही.  याबाबत रविवारी (दि.२३) सकाळी कुडाळ येथील रास्त धान्य दुकानावर शिवसैनिकांनी धडक देत आक्रमक भूमिका घेतली. आनंदाचा शिधा अद्याप रास्त धान्य दुकानांवर पोहोचलेला नाही, ही सरकारने जनतेची मांडलेली क्रूर चेष्टा असून आम्ही याचा निषेध करतो, असे यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले.

राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत १०० रूपयात ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा दिवाळी सणाच्या अगोदर केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड होणार होती. मात्र, दिवाळी सुरू झाली, तरी अद्याप सर्व वस्तुंचे किट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी रेशन धान्य दुकानांवर पोहोचलेले नाही. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे.

कुडाळ येथील शिवसैनिकांनी आज सकाळी तालुका खरेदी विक्री संघाच्या रास्त धान्य दुकानावर धडक दिली. यावेळी संबंधित प्रशासनाला जाब विचारत आनंदाचा शिधा उपलब्ध झालेला नाही, तो दिवाळी झाल्यावर देणार काय? असा सवाल केला. रास्त धान्य दुकानातून सदरचे किट अद्याप उपलब्ध झाले नसून उद्यापर्यंत उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. त्यावर शिवसैनिकांनी दिवाळी झाल्यावर शिधातील वस्तू देऊन उपयोग काय?, आता लोक रिकाम्या पिशव्या घेऊन घरी जातात त्याचे काय? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी तालुका पुरवठा निरीक्षकांशी संपर्क साधून आनंदाचा शिधा उपलब्धतेबाबत विचारणा करण्यात आली. साखर, तेल, डाळ या तीनच वस्तू जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. रवा वाटेत आहे. रवा उपलब्ध झाल्यावर सर्व वस्तूंचे किट एकाचवेळी रास्त धान्य दुकानांवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र दिवाळीनंतर या वस्तू देऊन उपयोग काय? असा सवाल मंदार शिरसाट यांनी केला.

सरकारने घोषणा केलेल्या आनंदाचा शिधा नेण्यासाठी आम्ही सकाळपासून रेशन धान्य दुकानावर उपस्थित आहोत. मात्र, या शिधाच्या वस्तूच उपलब्ध नसल्याने आम्हाला रिकाम्या पिशव्या घेऊन घरी जावे लागत आहे, असे ग्राहक रामचंद्र नाईक यांनी सांगितले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, न.पं.चे आरोग्य व शिक्षण समिती सभापती किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, ग्राहक निलेश परब, रामचंद्र नाईक, शशिकांत परब आदींसह ग्राहक उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button