गणेशोत्सवात लोकबाप्पा अवतरणार!; सिंधुदुर्गातील कलाकारांचा निसर्ग, लोककला संवर्धनाचा संदेश | पुढारी

गणेशोत्सवात लोकबाप्पा अवतरणार!; सिंधुदुर्गातील कलाकारांचा निसर्ग, लोककला संवर्धनाचा संदेश

कुडाळ : काशिराम गायकवाड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलावंतांनी एकत्र येत लोकबाप्पा या गाण्याची निर्मिती केली आहे. या उपक्रमातून निसर्ग आणि लोककला संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. नेरूर गावात याचे चित्रीकरण करण्यात आले असून, हे गाणे सर्वाना भुरळ घालणार आहे.

कोकणातील दशावतार, जव्हार-मोखाडा मधील वारली, दोडामार्ग मधील चपई, पिंगुळी येथील ठाकर  समाजातील चित्रकथी-कळसूत्री, घाटमाथ्यावरील तमाशा किंवा विदर्भातील झाडीपट्टी अशा विविध लोककलावंतांना एका छताखाली आणले आहे. आपल्या सर्व विघ्नांना हरण करण्यासाठी विघ्नहर्ता श्री गणपतीला एक साकडे घातले जात आहे. बाप्पा आम्हाला तारायला ये आणि या सगळ्यातून लोककलेचा विकास आणि लोककलेची समृद्धी होऊ दे. यासाठी हा घाट यंदाच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने घातला आहे, अशी माहिती या गाण्यातील सहभागी कलाकारांनी दिली.

लोकपरंपरा या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची एक शान आहे. त्याचप्रमाणे त्यातून होणारे प्रबोधन हे खरंतर आपल्या समाजासाठी आणि आपल्या निसर्ग संवर्धनासाठी अतिशय महत्त्‍वाचे आहे. भारुड, शाहिरी, कीर्तन या अशा प्रकारच्या लोककलेतून गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला होणार आहे. अशा विविध लोककला प्रकारांसाठी महाराष्ट्राची ओळख कायम टिकावी आणि निसर्गाचं कायम जतन व्हावे, यासाठी कुडाळ तालुक्यातील नेरूर या गावात या गाण्याचे शनिवारी चित्रीकरण करण्यात आले. लवकरच हे गाणे सर्वांच्या भेटीला येणार आहे.

या उपक्रमाची ही मूळ संकल्पना आणि निर्मिती डॉ. सुमित पाटील यांची आहे. मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी हे गाणं स्वतः संगीतबद्ध करून आपल्या सुमधुर आवाजात गायलं आहे. या संकल्पनेचे लेखन डॉ. प्रणव प्रभू यांनी केले आहे. या गाण्याचे चित्रीकरण आघाडीचे छायाचित्रकार पराग सावंत आणि मिलिंद आडेलकर यांनी केले आहे. या गाण्यात पद्मश्री पुरस्कार पुरस्कार प्राप्त लोककलावंत परशुराम गंगावणे, सिद्धेश नेरुरकर, निलेश गुरव, किशोर नाईक, शनी सोनावणे, प्रवीण बर्वेकर, देवेंद्र नेरूरकर, संकेत जाधव, विजय वालावलकर, सुवर्णा वायंगणकर, संदेश कदम, शिवहरी रानडे, शाम तेंडुलकर, विठ्ठल तळवलकर, तेजस मसके, सचिन कोंडस्कर, मनीष पाटकर, गौरव पाटकर, रोहन चव्हाण, रोशन चव्हाण, पूजा सावंत, शामली म्हाडेश्वर, सेजल पाटील, ऋतुजा भगत, सिद्धी कुडाळकर, सायली केसरकर, सुंदर चव्हाण, जयतीर्थ राऊळ, उपेंद्र पवार, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील लोककलावंत या उपक्रमात सहभागी असणार आहेत. या उपक्रमातून निसर्ग आणि लोककला संवर्धनाचा संदेश देण्यात आल्याची माहीती, कलाकारांनी दिली.

लोकसंस्कृती, लोककलांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न

गेल्या अनेक वर्षांपासून उत्सवांचे रूपांतर हे इव्हेंटमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते. खरंतर कुठलाही उत्सव साजरा करताना त्यातील आनंद वाटून घेऊन सामाजिक भान राखून उत्सव साजरे केले पाहिजेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांमध्ये या इव्हेंटच्या रूपांतराने आपल्यातला असणाऱ्या माणूसपणाचा, लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्रातील लोकपरंपरेचा आपल्याला विसर पडत चालला आहे. हा विसर पडू नये व पुन्हा एकदा आपली लोकसंस्कृती, लोककलांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती निलेश गुरव (नेरूर) यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button