दापोली : हापूस हंगामाच्या शेवटीही पावसाची धास्ती | पुढारी

दापोली : हापूस हंगामाच्या शेवटीही पावसाची धास्ती

दापोली : प्रवीण शिंदे

यंदाचा हापूस आंबा हंगाम वादळी वारे, अवकाळी पाऊस, मोहोर गळती आणि फुलकीडीच्या प्रादुर्भावामुळे नैसर्गिक संकटात सापडला. आता आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शेवटही पावसाच्या धास्तीतच आहे.

यंदाच्या वर्षी दापोली तालुक्यातील हापूस नुकसानीचा आकडा 50 कोटींच्या घरात गेला असून, या मुळे उत्पादक पुरता बुडाला आहे. अनेक संकटे पार करीत अखेर आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. उत्पादनात मोठी घट झाली असतानाही आंब्याला म्हणावी तशी अपेक्षित मागणीच राहिली नाही. त्यामुळे अधिकचे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च काढण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली आहे .

यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. काही दिवसात मान्सून कोकणात बरसेल असा अंदाज आहे. पावसामुळे आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून तोडणी कामांची लगबग दापोली तालुक्यात दिसून येत आहे. हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसाचा धोका होता तर आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना मान्सूनपूर्व पावसाचे सावट निर्माण झाले आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा उत्पादकांना बसला आहे.

कधी आवकाळी पाऊस तर कधी वाढते ऊन यामुळे थेट उत्पादनावरच परिणाम झाला आहे. आता शेवटच्या टप्प्यातील हापूस काढणीची लगबग सुरू असतानाच पुन्हा पावसाचे संकट ओढवणार आहे. कारण यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होत आहे. ही बाब शेतकर्‍यांना दिलासा देणारी असली तरी आंबा उत्पादकांची चिंता त्यामुळे वाढली आहे. आगोदरच उत्पादनात घट झाली आहे. आता आहे तो आंबा पदरी पाडून घेण्याचे प्रयत्न आंबा उत्पादक शेतकरी करीत आहे.

यंदाचा हंगाम मोठ्या प्रमाणात तोट्यात गेला आहे. या हंगामाची कसर भरून निघावी म्हणून केशर, रत्ना या फळांची जोड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला देखील दर मिळाला नाही.
-पांडुरंग मळेकर, आंबा उत्पादक, कात्रण, दापोली.

Back to top button