रत्नागिरी : नर्मदा परिक्रमा 108 दिवसांमध्ये पूर्ण | पुढारी

रत्नागिरी : नर्मदा परिक्रमा 108 दिवसांमध्ये पूर्ण

रत्नागिरी : विशाल मोरे

भूतलावर सर्वात मोठी प्रदक्षिणा म्हणून गणली गेलेली नर्मदा परिक्रमा राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील श्रीकांत राजाराम चव्हाण यांनी एकशे आठ दिवसांत पूर्ण केली. ही परिक्रमा पूर्ण करून नुकतेच ते आपल्या गावी परतले आहेत.

नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. श्री काशी क्षेत्राची पंचकोस, तर अयोध्या-मथुरा यांची चौर्‍याऐंशी कोस. नैमिपारण्य- जनकपुरी या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा- जवळजवळ तीन हजार 500 कि.मी. (1780 मैल) आहे. सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. कारण ती दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. प्रथम ही परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषीमुनींनी अतिशय खडतर तप म्हणून पूर्ण केली. त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे सांगितले जाते.

चव्हाण यांनी 3500 किलोमीटर पेक्षा जास्त पायी परिक्रमा करून सर्व धार्मिक स्थळांना भेटी देऊन सर्व नियमांचे पालन करून ही परिक्रमा एकशे आठ दिवसांत पूर्ण केली. त्यांनी सांगितले की, तब्बल चार महिने कुटुंबाला सोडून नर्मदामाईला भेटायला आलो होते. इथे मानसिक कणखरपणा दाखवावाच लागतो. एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचेच नाही, असा निश्चयच केला होता. एक एक दिवस पुढे सरकत होता. सुरुवातीला तळपायाला फोड आल्याने सेप्टिक झाले. पण रोजच 30 कि.मी. चालणे अपरिहार्यच होते. रात्रीची जागा मिळेल तिथे, मंदिरात, उघड्यावर, पारावर झोप घेऊन ही परिक्रमा पूर्ण केली.

नर्मदेने आपल्या आवाक्यातील सारा परिसर हराभरा आणि निसर्गसौंदर्याने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातून व केळीच्या बागांमधून जातो. तेथील भरपूर निसर्गसौंदर्य, शेती, ताजी फळं, ताज्या भाज्या या सर्वाचा परिक्रमेदरम्यान आनंद घेता आल्याचेही त्यांनी सांगितले.

नर्मदा मातेची इच्छा आणि सद्गुरुंचा आशीर्वाद आपली पूर्व पुण्याई आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद यांचे पाठबळ असल्यामुळेच नर्मदा परिक्रमा करणे शक्य झाले.
– श्रीकांत चव्हाण,सौंदळ, ता. राजापूर.

Back to top button