राजापूर : तालुक्यातील राजकीय समर्थक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश देणार नाही ? | पुढारी

राजापूर : तालुक्यातील राजकीय समर्थक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश देणार नाही ?

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील रिफायनरी प्रकल्प रद्द होईपर्यंत सर्व राजकीय पक्षांचे रिफायनरी समर्थक पदाधिकारी, आमदार, खासदार यांना गावांत प्रवेश देणार नाही. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रिफायनरी प्रकल्प विरोधी पॅनेल उभे करण्याचा निर्णय बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटना मुंबई व ग्रामीण यांच्या बैठकीत घेण्यात आला.

पंचकोशी बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटना मुंबई व ग्रामीण यांची संयुक्त बैठक सांताकूझ (मुंबई) येथे नुकतीच पार पडली. सभेच्या सुरुवातीला आतापर्यंत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रिफायनरी प्रकल्प विरोधी पॅनेलच्या माध्यमातून लढवून जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.

दरम्यान, राजकीय पदाधिकार्‍यांचे लिखित राजीनामे घेऊन सर्वच राजकीय पक्षांचे रिफायनरी समर्थक पदाधिकारी, आमदार, खासदार यांना रिफायनरी रद्द होईपर्यंत गावांत प्रवेश न देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, ग्रामीण अध्यक्ष अमोल बोळे, सरचिटणीस नरेंद्र जोशी, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, सचिव सतीश बाणे, मार्गदर्शक सत्यजीत चव्हाण, नितीन जठार, सचिन चव्हाण, तुळशीदास नवाळे, प्रकाश गुरव तसेच सचिन गुरव, प्रसाद गुरव, सुहास थोटम्म, प्रकाश नाचणेकर, सूर्यकांत सोडये, आत्माराम घाडी, नरेंद्र कामटेकर आणि गावकार-गावप्रमुख आदींनी मार्गदर्शन केले.
मेमध्ये महिलांचा मोठा मेळावा घेणार

वाडी-वाडीत रिफायनरी विरोधी पॅनलचे बोर्ड लावण्याचे व परिसरातील गावांमध्ये संपर्क अभियान राबविण्याचेही निश्चित करण्यात आले. पंचक्रोशीतील महिलाचे संघटन करणे व मे महिन्यात मोठा महिला मेळावा घेणे, आतापर्यंत मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, राज्यपाल आदींना भेटीसाठी दिलेल्या पत्रांचा आढावा घेणे. कोकणातील, मुंबई, पुणे तसेच दिल्ली येथील विविध संघटनांचे रिफायनरी विरोधात पत्र घेणे व जमीन विक्री होऊ नये म्हणून जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Back to top button