दापोली; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगारी खाडीकिनारी बेकायदेशीर वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने ठेवलेली क्रेन मशिनरी दापोली महसूल विभागाच्या पथकाने 2020 साली जप्त करून सील केली होती. मात्र, जप्त केलेली ही क्रेन मशिनरी दोन दिवसांपूर्वी रातोरात चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. याला दापोली महसूल विभागाने देखील दुजोरा दिला आहे.
सुमारे 15 लाख किमतीची ही क्रेन मशिनरी होती, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या वर्षी ही क्रेन मशिनरी सील करण्यात आली. त्यानंतर ती क्रेन दापोली महसूल विभाग कधी ताब्यात घेणार आणि दापोलीत कधी आणणार अशी विचारणा त्या वेळेस दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांना पत्रकारांनी केली होती. तर एखाद्या गाडीची व्यवस्था झाली की ती क्रेन दापोलीत आणली जाईल, असे तहसीलदार यांनी सांगितले होते. मात्र, दोन वर्ष दापोली महसूल विभागाला ती क्रेन ताब्यात घेण्यास वेळ मिळाला नाही आणि शेवटी ती क्रेन चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.
पांगारी या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे, अशा तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार येथील देगाव मंडळ अधिकारी सुधीर पार्दूले यांनी दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी येथे पंचनामा करून वाळू साठा आणि सील तोडलेली उभी क्रेन, अशी पंचयादी घातली होती. मात्र, ही क्रेन चोरीला गेल्याने दापोली महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या चोरीला गेलेल्या क्रेनबाबत येथील देगाव मंडळ अधिकारी सुधीर पार्दूले यांना पत्रकारांनी विचारणा केली असता चोरीला गेलेल्या क्रेनबाबत वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर दापोली महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्या कारवाईनंतर लगेच ही क्रेन या ठिकाणाहून चोरीला गेली आहे. त्यामुळे या क्रेन चोरीमागचे नेमके कारण काय असेल अशी चर्चा दापोली तालुक्यात आहे.