चिपळूण : पंचायतराजदिनी होणार गावागावांत ‘बालसभा’

चिपळूण : पंचायतराजदिनी होणार गावागावांत ‘बालसभा’
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये पंचायतराज व्यवस्था भक्कम व्हावी, यासाठी दि. 24 एप्रिल हा दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ग्रामसभा अधिक बळकट व्हाव्यात या उद्देशाने गावागावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन केले जाते. यावर्षी ग्रामसभेबरोबरच गावागावांमध्ये बाल सभा आयोेजित कराव्यात यासाठी शासनाने सर्व जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पं. स. व ग्रा.पं.ना निर्देश दिले आहेत. त्यानुसार 24 एप्रिल रोजी गावात ग्रामसभेबरोबरच बालसभा आयोजित कराव्या लागणार आहेत.

पंचायतराज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे तीन दुवे महत्त्वाचे आहेत. यावरच ग्रामीण विकास अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर पंचायतराज दिनी दरवर्षी गावामध्ये ग्रामसभा आयोजित केली जाते. याहीवर्षी अशा ग्रामसभा होणार आहेत. मात्र, या बरोबरच बालसभांचेही आयोजन करण्याचे निर्देश आहेत. भविष्यात ग्रामसभांमध्ये लोकसहभाग वाढावा, ग्रामसभा सक्षम व्हावी याचा पाया म्हणून आता बालसभा देखील होणार आहे.

बालसभेमध्ये पंधरा ते अठरा वयोगटातील बालकांची बालसभा होईल. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 24 रोजी स्थानिक वेळेनुसार या सभेचे आयोजन केले जाईल. बालसभेमध्ये उपस्थित असलेला हजेरीपट, सभेत चर्चेला घेण्यात येणारे विषय यांची नोंद स्वतंत्र वहीमध्ये करण्यात येणार आहे. शिवाय बालसभेचे छायाचित्र घेण्यात येणार आहे. गावातील बालकांच्या विविध समस्या, विकासाबाबत त्यांचे विचार, गावातील समस्यांबाबत बालकांच्या असलेल्या कल्पना, त्यांची मते या सभेमध्ये ऐकून घेतली जाणार आहेत व या सभेमध्ये होणारी चर्चा, निर्णय याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाणार आहे.

या सभेत झालेले निर्णय व चर्चा ग्रामसभेपुढे ठेवली जाणार आहे आणि त्यानंतर याच विषयावर पुन्हा ग्रामसभेत चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत, असे शासनाने निर्देश दिले आहेत. शाश्वत विकासाचे ध्येय 2030 पर्यंत प्राप्त करण्याच्या उद्देशाने प्रत्येक ग्रा. पं. ने आपली पंचायत बालस्नेही पंचायत बनविणे अपेक्षित असून या बाबतचा प्रस्ताव ग्रामसभेपुढे ठेवला जाणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित ग्रा. पं., ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत.

'या' विषयांवर होणार चर्चा

या सभेमध्ये बाल विवाह रोखणे, बालमजुरी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या बालकांच्या समस्या, बालकांच्या शिक्षणाचे प्रश्न, बालहक्क व त्याची अंमलबजावणी, बालकांसाठी असणार्‍या शासकीय योजना व त्यासाठी पात्र असणार्‍या बालकांची यादी, पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत बालकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व दहा टक्के निधी उपयोगाबाबत बालकांच्या सूचना, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ग्रा.पं.चे नावीन्यपूर्ण उपक्रम या विषयी चर्चा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news