रत्नागिरी : सलग चार दिवस सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्रकिनार्‍याकडे | पुढारी

रत्नागिरी : सलग चार दिवस सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्रकिनार्‍याकडे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थ्यांच्या संपलेल्या परीक्षा व सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे चार दिवस पर्यटकांसह चाकरमान्यांचे पायही जिल्ह्याकडे वळू लागले आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोलीकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता गृहित धरुन हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे सुमारे75 टक्क्यांहून अधिक बुकिंग झाले आहे.

गुरुवारी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती, 15 रोजी गुड फ्रायडे आणि त्याला जोडून आलेला शनिवार व रविवार या सुट्ट्यांमुळे नागरिकांनी पर्यटनाला पसंती दिली आहे. गणपतीपुळे, गुहागरमधील वेळणेश्वर या समुद्रकिनारे लाभलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांकडे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे पाय मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

सलग चार सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांचे प्रमाण जिल्ह्यात वाढणार आहे. मुळात ऑनलाईन बुकिंगमुळे पर्यटकांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सुमारे 80 टक्के हॉटेल व लॉजिंगचे बुकिंग झाले आहे. दोन वर्षांनंतर आलेला हा कालावधी सुखावह आहे.
– गणेश धुरी, हॉटेल व्यावसायिक

Back to top button