रत्नागिरी : ‘कोयना’मुळे वीज टंचाईपासून दिलासा

file photo
file photo
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या 1800 मेगावॅट विजेची निर्मिती सुरु आहे. येत्या 31 मेपर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण निर्धारितपैकी आता 17.60 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एरव्ही वीज निर्मितीसाठी दररोज 0.30 टीएमसी पाणीवापर होत असताना विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या तब्बल 0.70 टीएमसी पाणी वापर सुरू आहे. पाणी वापरावर मर्यादा असल्याने व सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता वीज निर्मितीसाठी आणखी 10 टीएमसी पाणीसाठा वापरण्यास जलसंपदा विभागाने विशेष मंजुरी दिली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाकडून वीजनिर्मितीमधील पाण्याची मर्यादा वाढल्याने वीज टंचाईपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सर्वच ग्राहकांना विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विजेची वाढती मागणी व कोळश्या अभावी अपुर्‍या वीजनिर्मितीमुळे सुमारे 2,500 ते 3,000 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे. गेल्या फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीज वापरदेखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28,000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल 4000 मेगावॅटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल 24500 ते 24800 मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी 25500 मेगावॅटवर लवकरच जाईल अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या कालावधीतदेखील 22500 ते 23000 मेगावॅट विजेची मागणी आहे.

महावितरणची एकूण विजेची करारीत क्षमता 37,900 मेगावॅट असून त्यापैकी स्थापित क्षमता 33700 मेगावॅट इतकी असून त्यापैकी एकूण 21057 मेगावॅट (62%) औष्णिक विद्युत क्षमता आहे. परंतु, देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या करारीत औष्णिक वीजनिर्मितीत देखील घट झालेली आहे. तसेच काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने महावितरणला सध्या औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल 6000 मेगावॅटने कमी वीज उपलब्ध होत आहे.

सध्याच्या अभुतपूर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरणला 2500 ते 3000 मेगावॅट विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते.

सध्याच्या अत्यंत प्रतिकूल कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेची मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news