लिंबूवर्गीय फळांना मागणी वाढली | पुढारी

लिंबूवर्गीय फळांना मागणी वाढली

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात अंगांची होणारी लाहीलाही शमवण्यासाठी थंड पेये तसेच सरबताला प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे लिंबू, संत्रे, मोसंबी यांना मागणी वाढली असून त्यांचे दरही वाढले आहेत.

शनिवारच्या आठवडा बाजारात बरेचसे ग्राहक फळे खरेदी करताना दिसत होते. लिंबू, संत्रे, मोसंबी यांसह कलिंगडाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आवक कमी असल्याने याचे दर प्र्रचंड वाढले होते. एरव्ही 10 रुपयांना मिळणारी चार लिंबे 20 रुपयांना तीन या प्रमाणे मिळत होती. संत्रे, मोसंबी यांचे दरही शंभरीपार पोहोचले. कलिंगडही भाव खात असून किलोमागे 30 ते 60 रुपये किलोने विकले जात आहे.

शनिवारच्या आठवडा बाजारात कांदा 12 ते 20 रुपये किलो, बटाटा 25 रुपये, गवार, फरसबी, वांगी 80 रुपये, टोमॅटो 15 रुपये, कोबी 20 ते 30 रुपये नग, फ्लॉवर 30 ते 40 रुपये नग, हिरवी मिरची 100 ते 120 रुपये किलो, आले 80 रुपये तर कोथिंबीरीची एक जुडी 15 ते 20 रुपयांना मिळत होती. चवळी, लालमाठ, हिरवामाठ यांची जुडी 15 रुपये, मुळा 15 ते 20 रुपये, वाल 10 रुपये तर गावठी मेथी 10 रुपयाला 15 जुड्या मिळत आहेत.

डाळी आणि कडधान्याच्या वाढलेल्या किमती अजूनही कमी झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात 100 रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ सध्या 120 ते 140 रुपये किलोने विक्री केली जात आहे, तर 90 ते 100 रुपये किलोने विकली जाणारी मूग डाळ सध्या 110 ते 120 रुपये किलोने विक्री केली जात आहे. उडीद डाळ, चणा डाळ, मसूर डाळ तसेच ज्वारी यांच्या दरातही वाढ झाली असून, सद्य:स्थितीला किरकोळ बाजारात 100 ते 125 रुपये किलोने यांची विक्री केली जात आहे. खाद्यतेलापाठोपाठ आता डाळींच्या किमतीही वधारल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून, त्यांच्यामधून या महागाईविरोधात सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चिकन, मासळीच्या दरातही वाढ

भाज्यांचे दर वाढल्यामुळे चितेंत असलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी भुर्दंड बसणार आहे. मागील काही दिवसांपर्यंत 130 रुपये किलोने जिवंत कोंबडी मिळत होती. मात्र, आता दर दीडशेपार पोहचले असून, जिवंत कोंबडी 160 ते 180 रुपये किलोने मिळत आहे. समुद्रात मासळीही मुबलक मिळत नसल्याने माशांचे दर वाढले आहेत. बांगडा 180 ते 200, कोळंबी 150 ते 450, सुरमई 600 ते 900, पापलेट 800 ते 1200, सरंगा 400 ते 500 रुपये किलोने विक्री होत आहे.

Back to top button