निपाणी; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही लहान आहात, चांगले वागा असा सल्ला देणार्याचाच खून पाच जणांनी मिळून केला असून, पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पैकी दोघे सज्ञान असून, त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. तर तिघे हल्लेखोर अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. निपाणी पोलिसांनी तीनच दिवसांत खुनाचा छडा लावला आहे.
सैनिक टाकळी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील मूळ रहिवाशी आणि अलिकडे निपाणीत राहणारा अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय 21) याचा पाच मित्रांनी चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री येथील मानवी गल्लीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण पाचजणांना गुरुवारी अटक केली. अमन हसन एकसंबे (वय 22 रा.जत्राट) व सैफअली शेरअली नगारजी (वय 22 रा. मेस्त्री गल्ली, निपाणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उर्वरित तिघे अल्पवयीन आहेत. त्यापैकी एकावर मोबाईल चोरी व घरफोडीचाही गुन्हा दाखल आहे.
अभिषेक याचा महिन्यांपूर्वी या पाच जणांशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. यावेळी अभिषेकने, तुम्ही लहान आहात तेव्हा चांगले वागा, असा सल्ला दिला होता. हाच राग मनात धरून खून केल्याची माहिती सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी दिली.
रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चित्रपटगृहातील काम आटोपून मित्राच्या दुचाकीवरून आलेला अभिषेक घरी जात असातना दारातच दबा धरून बसलेल्या मित्रांनी चाकूने हल्ला चढवला. त्यानंतर एक अल्पवयीन हल्लेखोर स्वतःहून पोलिसांत हजर झाला. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, निपाणीतील दोन, बैलहोंगल येथील एक अल्पवयीन तर हत्यार पुरविणारा सैफअली नगारजी व गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या अमन एकसंबे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पाचही जणांनी गेल्या महिन्यात झालेल्या वादाची माहिती दिली. तसेच अभिषेकने आम्हाला, तुम्ही लहान आहात असे सांगून चांगले वागण्याचा सल्ला दिला होता. याच कारणातून आपण अभिषेकचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरंगी यांच्या सूचनेनुसार डीएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर, सहायक उपनिरीक्षक डी.बी.कोतवाल, हवालदार विनोद असोदे,एस.एस. चिकोडी, शेखर असोदे, सुदर्शन अस्की, एन. बी. कल्याणी यांनी तपासाची चक्रे गतिमान करून ताब्यातील अल्पवयीन युवकांकरवी मोबाईल लोकेशनच्या आधारे बुधवारी रात्री फरार असलेल्या चौघाजणांना काकती येथील ईदगाहजवळून सापळा रचून ताब्यात घेतले.
रविवारी मध्यरात्री अभिषेकचा खून केल्यानंतर स्वतःहून पोलिसांत हजर झालेल्या एक अल्पवयीन संशयित वगळता इतर चौघांनी ट्रकमधून प्रवास करत काकती परिसरातील ईदगाह गाठले. चौघेही तेथेच थांबले. चौघांनीही खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे जाळून सोबत आणलेली हत्यारे उसाच्या शेतात पुरून ठेवली. अभिषेकचा खून करण्यासाठी सैफअली नगारजी याने स्टील रॉड व दोन चाकू पुरवले होते. खुनाचा कट शहरातील एका स्मशानभूमीत पाच जणांनी एकत्रित येऊन रचला होता, अशी माहिती सीपीआय शिवयोगी यांनी दिली.