रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कमी दाबाच्या प्रभावामुळे रत्नागिरीत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मार्च महिन्यात कोकणात तापमानात वाढ झाली असताना मार्च अखेरीनंतर जिल्ह्यात मळभी वातावरण तयार झाले. त्या नंतर एप्रिलमध्येही वातावरण ढगाळ राहिल्याने तापमानात घट झाली. बुधवारी म्हणजे आजही रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाने रत्नागिरीत पाऊससद़ृश स्थिती निर्माण झाली. मंगळवारी शेजारील सिंधुदुर्ग

जिल्ह्यात जोरदारपाऊस झाला तर रत्नागिरीत काही भागात हलका शिडकावा झाला. मात्र आता पुढील दोन दिवस हवामान विभागाने अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकण विभागात 7 एप्रिल रोजी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर काही भागात विजांचा कडकडाटसह पाऊसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातील अन्य आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पावसासह विजांचा कडकडाटही होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे. या 10 जिल्ह्यात पावसाच्या सरी तरी कोसळणार आहेत. या सोबतच विजांचा कडकडाटही होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे.

 

Back to top button