अणुस्कुरा घाट : तारणहार ‘अणुस्कुरा’वर आली मरणकळा | पुढारी

अणुस्कुरा घाट : तारणहार ‘अणुस्कुरा’वर आली मरणकळा

राजापूर : शरद पळसुले-देसाई   

आंबा घाट बंद झाल्यानंतर राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी अणुस्कुरा घाटाने आपली वाट मोकळी करून दिली; पण अडचणीत तारणहार ठरलेल्या अणुस्कुरा घाटावरच आता मरणकळा आली आहे. या घाटाची वाटही बिकट बनली आहे. सतत कोसळणार्‍या दरडी दरडावत आहेत. दरड कोसळली म्हणजे उपाययोजना केल्या जातात; पण दरडी कोसळूच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय करण्याकडे शासनाचे दुर्लक्षच आहे.

आंबा घाट बंद झाल्यानंतर साडेसात कोटी रुपये दुरुस्तीसाठी मंजूर झाले; मात्र या घाटामध्ये कोणतेही काम अद्याप झालेले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील पवसापासून ते विटा पेठेपर्यंत जाणारा मार्ग अणुस्कुरा घाटातून जातो. गेल्या जुलैमध्ये कोकणात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीत कोकण आणि कोल्हापूरला जोडणार्‍या काही घाटांत भूस्खलन होऊन घाटमार्गे वाहतूक सेवा बंद पडली होती. आंबा घाटाचा त्यात समावेश होता. निसर्गाच्या दणक्यातून तेव्हाही अणुस्कुरा घाट सुटला होता. केवळ हा एकच घाट प्रवासासाठी सुरू राहिला. रत्नागिरी जिल्ह्यासह लगतच्या सिंधुदुर्गमधील बहुतांशी वाहतूक अणुस्कुरामार्गे सुरू राहिली.

अणुस्कुरा घाटाला ऐतिहासिक संदर्भ आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजापुरातील वखारीतून कोल्हापूरला माल किंवा अन्य साहित्य पाठवीत असत, ते अणुस्कुरा घाटातूनच. त्यावेळी घाटातील पायवाटेनेच कोकणसाठीही माल आणला जात असे. कोकणातील शेतकरी
मलकापूरसह अन्य बाजारांतून खरेदी केलेले बैल व अन्य पाळीव जनावरे आणण्यासाठी या घाटाचा वापर करीत असत. त्या जुन्या पाऊलवाटांचा आधार घेऊनच घाटाचे खोदकाम झालेे आणि आजचा मार्ग आकाराला आला.

अणुस्कुरा आकाराला येण्याची वाटही तशी नागमोडी आहे. राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी सोयीचा घाटमार्ग असावा म्हणून शासनाने अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाला मंजुरी दिली. काम सुरू झाले आणि निधीअभावी रेंगाळत गेले. सन 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे शासन आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री रवींद्र माने यांच्या पुढाकाराने घाटाच्या खोदकामाला गती मिळाली. सन 2002 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत अणुस्कुराचे उद्घाटन झाले आणि घाटमार्ग वाहतुकीला सुरू झाला.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील अणुस्कुरा घाटाची रचनाच वेगळी आहे. दोन्ही बाजूंना आकाशाला भिडणारे उंचच उंच कडे आणि त्यामधून जाणारा रस्ता असे त्याचे रूप आहे. रस्ता अरुंद आहे; शिवाय वळणे नागमोडी आहेत. अत्यंत आकर्षक असा हा धोका आहे! उंच कडे धोकादायक आहेतच, अधूनमधून दरडी कोसळतात, त्या वेगळ्या! कोसळलेल्या दरडींचा मोठा ढिगारा रस्ता आडवा करतो. वाहतूक बंद पडते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या; पण त्यावरही दरडी कोसळून त्या भिंतीही ढिगार्‍याखाली सापडल्या.

ऑगस्टपासून आंबा घाट बंद पडल्यावर तेथील वाहतुकीचा भारही अणुस्कुरावर आला आहे. ओणीपासून अणुस्कुरा गावापर्यंत संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. अवजड वाहनांमुळे तर घाटात अनेक ठिकाणी रस्ताच खचला आहे. गेल्या काही वर्षांत घाटावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

डांबरीकरण गरजेचे आहे. कठडे भक्कम बनविणे, उंच कडे तोडून भविष्यात दरडी कोसळणार नाहीत, याची दक्षता घेणे अवश्यक आहे. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणांवर संरक्षक कठडे आवश्यक आहेत.

ओणी-अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने 7 कोटी 44 लाख रुपये मंजूर केल्याचे बॅनर पाचल परिसरात झळकले खरे; पण प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही.

राजापूर-कोल्हापूरसाठी जवळचा घाटमार्ग घाटात विविध वन्यजीव व्यापारी केंद्र कोल्हापुरातील बहुतांशी मालवाहतूक अणुस्कुरामार्गे
अर्जुना नदीचे उगमस्थळ

Back to top button