तीन राज्यांचा ‘तिलारी’, स्वत: मात्र भिकारी! - पुढारी

तीन राज्यांचा ‘तिलारी’, स्वत: मात्र भिकारी!

दोडामार्ग / चंदगड : रत्नदीप गवस / नारायण गडकरी

तिलारी घाट नुसताच नावाला तिलारी नाही. तो महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन समृद्ध राज्यांना जोडण्याचे काम करतो. तीन राज्यांना आपल्या परीने आणखी समृद्ध करतो. पण, स्वत: या घाटाचा आकार एखाद्या कुपोषितासारखा खंगलेला का आहे, असा प्रश्न पडतो. तीव्र स्वरूपाचे चढउतार अन् नागमोडी वळणांमुळे या घाटावर अपघात नित्याचे आहेत. ते टाळताच येऊ शकत नाहीत काय, तर तसेही नाही. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण केल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. घाट मार्ग सुरक्षित करायचा तर रुंदीकरण आवश्यक आहे.

तिलारी घाट 1980-85 दरम्यान उभा राहिला. घाट रस्ता 7 कि.मी.चा आहे. तिलारी धरण आणि वीजघर येथील वीज निर्मिती केंद्राची अवजड मशिनरी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने या घाटाची निर्मिती केली. पुढे दोडामार्ग, गोवा येथील लोकांना बेळगाव, कोल्हापूरला जाण्यासाठी हा घाट सोयीचा वाटू लागला. वर्दळ वाढली. दुसरीकडे धरणाचे, वीज निर्मिती केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने या घाटाच्या दुरुस्तीसाठी निधी देणे थांबविले.

पुढे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली, तेव्हा लोक ओरडू लागले, पण दुरुस्तीवर खर्च कोण करणार? हा घाट मार्ग बांधकाम विभागाच्या ताब्यात नसल्याने निधी मंजूर करण्यात तांत्रिक अडचण होती. पाटबंधारे विभागाने तर आधीच हात वर केलेेले… दोन्ही विभागांच्या जात्यात वाहनचालक व प्रवासी भरडले जात होते. आ. दीपक केसरकर हे अर्थराज्यमंत्री झाले आणि मग त्यांनी हा घाट मार्ग चंदगड बांधकाम विभागाकडे वर्ग केला. घाट दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपये निधीही मंजूर झाला. घाट मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले.

मे 2019 मध्ये घाट दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्याच वेळी एका खासगी दूरसंचार कंपनीने केबल टाकण्यासाठी घाटमार्गालगत खोदकाम केले. परिणामी 2019 च्या पावसाळ्यात घाट तीन ठिकाणी खचला. तब्बल दोन महिने वाहतूक पूर्णतः ठप्प होती. नंतर बांधकाम विभागाने भराव घातला व संरक्षक भिंत बांधून मार्ग पूर्ववत सुरू केला.

घाटात 23 ‘डेंजरस झोन’

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव-कर्नाटकातील प्रवाशांना कोकण, गोव्यात जाण्या-येण्यासाठी हा अत्यंत जवळचा रस्ता आहे. घाट रस्ता अत्यंत धोकादायक आहे. तथापि, या मार्गाचा प्रवास कमी अंतराचा असला तरी मरणाला शॉर्ट कट शोधणारा रस्ता आहे. या सात कि.मी. अंतराच्या घाट रस्त्यात तब्बल 23 ‘डेंजरस झोन’ आहेत. 23 ठिकाणची ही अडथळ्यांची शर्यत पार करणारा चालक सराईत आणि धाडसी असला तरच ही शर्यत पार करतो.

जलविद्युत प्रकल्पासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. प्रकल्प पूर्ण झाला आणि सिंचन विभागाने रस्त्याच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष केले. अजिबातच दुरुस्ती झाली नसल्याने पावसाळ्यात अवजड वाहनांना बंदी असायची. त्यानंतर 5 वर्षांपूर्वी हा रस्ता चंदगड बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. अवघड वळणाच्या या रस्त्यांवर तीव्र उतार, नागमोडी धोकादायक वळणे, असुरक्षित कठडे यामुळे वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतात. बेळगाव ही जवळची मोठी बाजारपेठ असल्याने दोडामार्ग, सावंतवाडी भागातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात.

तिलारी घाटाने घेतले अनेक बळी

तिलारी घाट रस्ता हा जवळचा मार्ग म्हणून भाजीपाला, ब्रॉयलर कोंबडी, खडी घेऊन जाणारे डंपर, छोटे-मोठे ट्रक, क्षमतेपेक्षा अधिक बोजा घेऊन जाणारी वाहने अपघातग्रस्त होऊन दरीत कोसळली आहेत. या घाटाने अनेक जणांचा बळी घेतला आहे. कोसळलेली वाहने आजही खोल दरीत अडकून पडली आहेत. आताही तुटलेल्या अवस्थेतील संरक्षक कठडे, रेलिंग यामुळेच अधिक धोका वाढतो.

Back to top button