

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १७ तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान जमा करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक यावर निवडणूक जुमला असल्याची टीका करत असले तरी कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
आम्हाला जनतेने पुन्हा संधी दिल्यास ही योजना पुढील पाच वर्षेदेखील चालूच राहील, हा माझा वादा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या जनसन्मान यात्रेचा दिंडोरीतून शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
कांदा निर्यातबंदी होऊ नये, शुल्क माफी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच महायुतीत सध्या ज्या पक्षाकडे ज्या जागा आहेत, त्या ठिकाणी तो पक्ष लढेल. एखाद-दुसऱ्या जागेवर अदलाबदली होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री काळारामचरणी
पंचवटीमधील श्रीकाळाराम मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात महाभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळू दे, असे साकडे पवार यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना घातले.