

गणेश विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत पाण्यात बुडून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नांदेड, शहापूर, मुंबई, चाकण आणि जळगावचा समावेश आहे.
नांदेड : जिल्ह्यातील गाडेगाव परिसरात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण आसना नदीच्या पाण्यात बुडाले, तर तिसर्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवले. बालाजी कैलास उबाळे (18) आणि योगेश गोविंद उबाळे (17) यांचा मृतांत समावेश आहे.
शहापूर : येथील भारंगी नदीत विसर्जनावेळी पाच तरुण बुडाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले. दोघांचा शोध सुरू आहे.
मुंबई : साकीनाका परिसरात एका विसर्जन मिरवणुकीदरम्यान हाय टेन्शन वायरचा शॉक लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी आहेत. बिनू शिवकुमार असे मृताचे नाव आहे.
पुणे : खेड, शिरूर आणि जुन्नर या तालुक्यांत शनिवारी (दि. 6) गणेश विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडल्या. खेडमधील वाकी, बिरदवडी, शेलपिंपळगाव; शिरूरमधील तळेगाव ढमढेरे व जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा परिसरात सहा जणांचा विहीर, नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आणि काहींचा शोध अद्याप सुरू आहे.
जळगाव : ममुराबाद येथील गणेश कोळी (25) हा विसर्जनादरम्यान गिरणा नदीत वाहून गेला. तर गिरणा पंपिंग भागात राहुल सोनार याचा गिरणात बुडून मृत्यू झाला.