

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीए मधील घटक पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. भाजपच्यावतीने सर्व जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. असे असले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता रामदास आठवले यांनीही आपले उमेदवार दिले आहेत. रिपाई आठवले गटाच्या वतीने दिल्ली विधानसभेसाठी १५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पक्षाला सत्तेवरून दूर करण्यासाठी काम करेल आणि दिल्लीत काँग्रेसला पुन्हा शून्य जागांवर रोखण्यासाठी काम करेल. दिल्ली विधानसभेत आम्ही १५ जागा लढवत आहोत, उर्वरित सर्व जागांवर आम्ही भाजपला समर्थन देत आहोत. भाजप दिल्लीत ऐतिहासिक बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पक्षाच्या सरकारला हाकलून लावेल. त्यांच्या दररोज नवीन भ्रष्टाचाराच्या कृत्यांनी दिल्लीतील लोक त्रासले आहेत, असेही आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले. आठवले म्हणाले की, देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे आणि देशात नवीन विक्रम घडवत आहे तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारमुक्त दिल्लीचे आश्वासन देत आहेत. मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले, असे म्हणत त्यांनी केजरीवाल यांनी टोला लगावला.