https://www.youtube.com/watch?v=I1pRDZ6clUcकेंद्राकडून पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबूच्या विमा प्रस्तावास मान्यता
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यास यश
पुणे : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृगबहार २०२५ मधील पेरू, द्राक्ष, संत्रा, लिंबू या पिकांसाठीच्या विमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत आता 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्याने शेतकऱ्यांना वाढीव मुदतीत आता विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येत आहे. मृगबहारमध्ये संत्रा, पेरू, लिंबू ,द्राक्ष या चार पिकांसाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०२५ होता.
विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in हे दिनांक १३ जून २०२५ रोजी सुरू झाले. त्यामुळे चार फळपिकांच्या विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अतिशय अल्प कालावधी मिळाला.
त्यामुळे हा कालावधी वाढवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास केंद्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. आता या चार पिकांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ३० जून २०२५ अशी राहील. तरी पेरू, लिंबू ,द्राक्ष, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत सहभागाबाबत पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन राज्याचे कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी केले आहे.