

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या कार्यालयासमोर निर्घृण गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली होती. मात्र आता पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुख्य आरोपी जीशान अख्तर याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.
Baba Siddiqui Murder Case Update
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जीशान अख्तर असे आहे. विशेष म्हणजे, ही हत्या संपूर्ण मुंबईला हादरवून टाकणारी होती आणि या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्याकांडातील फरार आरोपींमध्ये शुभम लोनकर, अनमोल बिश्नोई आणि जीशान अख्तर यांचा समावेश आहे. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, हत्येच्या वेळेस जीशान अख्तर आणि शुभम लोनकर हे अन्य आरोपींना सूचना देत होते.
मुंबई पोलीस गेल्या अनेक महिन्यांपासून जीशान अख्तरचा शोध घेत होते. अखेर पंजाबमधील जालंधर येथे त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमवारी उशिरा रात्री पंजाबचे माजी मंत्री आणि भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या प्रकरणातही पाकिस्तानशी संबंधित आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. यातील एक आरोपी म्हणजे जीशान अख्तर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या जीशान अख्तरला पंजाब पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले असून, तोच बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसही लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.