औरंगाबाद : मुलाच्या अपहरणाचा संशयाने मनोरुग्णाला पकडले; चौकशीनंतर सोडले | पुढारी

औरंगाबाद : मुलाच्या अपहरणाचा संशयाने मनोरुग्णाला पकडले; चौकशीनंतर सोडले

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : मुलांचे अपहरण करणारा असा संशय आल्याने नागरिकांनी एकाला पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास शहरातील ईदगाह परिसरात घडली. दरम्यान चौकशीत युवक मनोरुग्न असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला नंतर सोडून दिले.

रविवारी सकाळी ईदगाह परिसरातील काही नागरिकांनी एकाला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले. सदर युवक एका नऊ वर्षीय मुलाला कड्यावर घेऊन पळत होता. मुलाने आरडाओरड केल्याने नागरिकांनी त्याला पकडले व ठाण्यात आणले.

पोलिसांनी युवकाची कसून चौकशी केली. मात्र तो काही बोलतच नव्हता. यामुळे पोलिसही पेचात पडले. तो मनोरुग्ण असल्याचे त्याच्या हावभावावरून दिसून येत होते. यामुळे पोलिसांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तो मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट केले. यानंतर पोलिसांनी त्याला जेवण देऊन सोडून दिले.

दरम्यान, तालुक्यात मुले चोरण्याच्या अफवा थांबलेल्या नाही. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पळशी येथे अशीच अफवा पसरल्याने पोलिस प्रशासनाला घाम फुटला होता. सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील मुठाड फाट्यावर एका कारचालकाला जमावाने बेदम मारहाण केली होती. यावेळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज वेळेवर पोहचल्याने अनर्थ टळला होता. अशा घटनांनासंदर्भात पोलिसांकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. तरीदेखील अधूनमधून अफवांना पेव फुटत आहे.

दरम्यान, मुले पळवणारी टोळीची सध्या अफवा पसरवली जात आहे. असा कुठलाही प्रकार निदर्शनास आलेला नाही. अनोळखी व्यक् ती किंवा संशय आल्यास पोलिसांना कळवावे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. खात्री करावी तसेच अफवांवर विश्चास ठेवू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी केले.

Back to top button