औरंगाबाद : रांजणगावात गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा | पुढारी

औरंगाबाद : रांजणगावात गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव येथील दत्तनगर फाट्याजवळ सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून 7 रिकामे व 5 अर्धे भरलेले घरगुती व 3 व्यावसायिक असे 15 गॅस सिलेंडर, एलपीजी रिक्षा व गॅस रिफिलिंगचे साहित्य असा जवळपास 2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव येथील दत्तनगर फाट्याजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षामध्ये गॅस भरून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून एमआयडीसी वाळूज पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने पुरवठा विभागाच्या मदतीने बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास छापा मारला.

यावेळी पथकाला सय्यद अझहर सय्यद रफीक (36, रा. कमळापूर फाटा, रांजणगाव) हा कृष्णा जोशी याच्या मालकीच्या पत्राच्या शेडमध्ये अवैधरीत्या तसेच कोणतीही खबरदारी न घेता शेख सलीम शेख महंमद याच्या अ‍ॅपेरिक्षा (एमएच 20, ईएफ 1079) मध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरताना दिसून आला. पोलिसांना पाहून रिक्षा चालक शेख सलीम तेथून पळून गेला. पथकाने सय्यद अझहर यास ताब्यात घेऊन एचपी कंपनीचे 15 गॅस सिलिंडर, 2 विद्युत मोटारी, 2 वजन काटे,अ‍ॅपेरिक्षा (एमएच 20, ईएफ 1079) असा जवळपास 2 लाख 18 हजार 890 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोलिस अंमलदार अविनाश ढगे यांनी केली

Back to top button