औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहुचर्चित जाहीर सभा रविवारी (दि. 1) येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. सभेसाठी पुणेमार्गे सायंकाळी पाच वाजता राज ठाकरे शहरात दाखल झाले. मनसैनिकांकडून क्रांती चौकात ढोल-ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मे चा अल्टिमेटम दिला आहे. तत्पूर्वीच ठाकरेंनी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर केल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. सभेला पोलिसांनी अर्टी-शर्तींनुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे कुणावर तोफ डागतील, कोणती नवी भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सभेसाठी शनिवारी सकाळी पुण्याहून शंभर पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन निघालेले राज ठाकरे सायंकाळी पाच वाजता औरंगाबादेत पोहोचले. त्यांच्यासोबत वाहनांचा मोठा ताफा होता. क्रांती चौकात मनसैनिकांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.