यवतमाळ : विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील सातही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. तर पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ६५ टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडल्याचा प्रकार नाही.
आज बुधवारी सकाळी ७ वाजता पासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ७.२० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात थंडी वाढल्याने पहिल्या टप्प्यावर परिणाम झाल्याचे बोलल्या जाते. सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के सरासरी मतदान झाले होते. तर दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले आहे. यानंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे जाऊन मतदानाचा टक्का वाढविला. दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ५० टक्के मतदान पार पडले. तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे. ६ वाजतानंतर आलेल्या मतदारांच्या टक्केवारीचा आकडा रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकला नसला तरी जवळपास ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
२३ रोजी मतमोजणी
वणी मतदारसंघाची मतमोजनी शासकीय धान्य गोदाम क्र. २ ब्लॉक नं. १ वरोरा रोड वणी येथे होणार आहे. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती गोदाम क्र. १ येथे होत आहे. यवतमाळ गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज धामणगाव रोड यवतमाळ येथे होणार आहे. दिग्रस मतदारसंघाची मतमोजनी धान्य गोदाम आर्णी रोड दारव्हा येथे होणार आहे. आर्णीची मतमोजनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह पांढरकवडा येथे होणार आहे. पुसद तालुका क्रिडा संकुल बचत भवन पुसद येथे होणार आहे. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती गोदाम उमरखेड येथे होणार आहे.