कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघात आगामी काळात कारखानदारी आणण्यासाठी आपले प्राधान्य राहिल. भागाभागातील तरूणांना रोजगार देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. भविष्यात मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम दिले जाईल, अशी ग्वाही कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. महेश शिंदे यांनी दिली.
कुमठे, ता. कोरेगाव येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, हणमंत जगदाळे, पोपटनाना जगदाळे, माजी सरपंच सुधीर जगदाळे, सरपंच संतोष चव्हाण, अॅड. अशोक वाघ, अॅड. भैय्यासाहेब जगदाळे, संभाजीराव चव्हाण, सौ. साधना जगदाळे, शुभम जगदाळे, तन्वीर जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. महेश शिंदे पुढे म्हणाले, कुमठे हे ऐतिहासिक गाव, पण सुरुवातीला मला मानतच नव्हतं. मात्र गेली दोन वर्ष सरपंच आपल्या विचारांचा झाल्यापासून कुमठे गावात विकासपर्व सुरू झाले. सर्वांगीण विकास कामांच्या माध्यमातून गाव बदलायला लागले आहे. कुमठे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःच्या खर्चाने पाणंद रस्ते सुरू केले. गावाच्या विकास कामासाठी आजअखेर 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे. त्यामध्ये कुमठे ते ल्हासुर्णे, कुमठे ते तडवळे, कुमठे ते चंचळी, कुमठे ते जळगाव, कुमठे ते चिमणगाव आणि कुमठे ते गोळेगाव रस्ता यासह विविध विकासकामे केली आहेत. तसेच क वर्ग देवस्थान योजनेमधून धारणाथ महाराज मठासाठी उपलब्ध करून दिला. तेली समाज स्मशानभूमी निधी दिला आहे.
मंगेश क्षीरसागर म्हणाले, कृष्णा खोर्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर गावात सलग दोन ते तीन महिने कॅनालला पाणी आले. यामुळे उन्हाळ्यात तीळ गंगा नदी वाहती झाली. या पाण्याने कुमठे गावच नव्हे तर पंचक्रोशीतील गावातील शेतकरी सुखावला, हे विसरून चालणार नाही. दोन्ही आमदारांमध्ये सर्वांगीण विकास कामांमध्ये तुलना करावयाची म्हटले तर आ. महेश शिंदे हे विकासासाठी झटले असल्याचे दिसून येते.
कोरेगाव तालुक्यातील खरी काँग्रेस राष्ट्रवादीने संपवली आहे. संपूर्ण जरंडेश्वर कारखाना गट आ. महेश शिंदे यांच्या पाठिशी आहे. कुमठे गावातील दहशत आता मोडीत निघाली आहे. कुमटे गाव विकासाच्या पाठीशी असते हे येणार्या निवडणुकीत दाखवून देवू, असे प्रतिपादन पोपट जगदाळे यांनी केले.