ओरोस : जिल्ह्यात झालेल्या तीन विधानसभा मतदारसंघांत कुडाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 72.44 टक्के, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 71.56 तर त्या खालोखाल कणकवली विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. या अटीतटीच्या लढतीत सर्वाधिक कुडाळ विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले आहे. या वाढीव मतदानात कोणाच्या बाजूने कौल लागतो आणि कोण बाजीगर ठरणार, कुणाच्या माथी विजयाचा गुलाल लागणार, हे उद्या, 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार. तिन्ही मतदारसंघांत चमत्कार होणार की, जे आहेत तेच आमदार जैसे थे राहणार, याची उत्कंठा लागून राहिली आहे. दरम्यान, 23 रोजी दुपारी 12 वा.पर्यंत तिन्ही मतदारसंघांत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांच्या दुरंगी लढत झाली. या विधानसभा मतदारसंघात 2 लाख 31 हजार 740 मतदारांपैकी 1 लाख 61 हजार 096 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 83 हजार 003 पुरुष तर 78 हजार 093 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 69.52 टक्के मतदान झाले. या लढतीत गेली.(Maharashtra assembly poll)
दहा वर्षे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि संघटन कौशल्यावर आपण विजयी होणार अशी खात्री त्यांनी दिली असून उद्धव ठाकरे शिवसेनेचे संदेश पारकर यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामाची आणि एक संधी म्हणून आपल्याला जनतेने आमदार बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिंदे शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात दुरंगी अटीतटीची लढत आहे. यात 2 लाख 17 हजार 186 मतदारांपैकी 1 लाख 57 हजार 323 मतदारांनी मतदानाचा उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत सर्वाधिक 72.44 टक्के मतदान केले. या अटीतटीच्या लढतीत दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र मतदार राजा कोणाला साथ देतात याची उत्सुकता लागून आहे.(Maharashtra assembly poll)
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीत शिवसेना महायुतीचे विद्यमान आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर विरुद्ध उबाठा शिवसेनेचे राजन तेली, अपक्ष विशाल परब,अर्चना-घारे-परब यांच्यात चौरंगी अटीतटीची लढत आहे. या मतदारसंघात 2 लाख 30 हजार 02 मतदारांपैकी 1 लाख 74 हजार 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येथे चौघाही उमेदवारांनी आपणच बाजी मारणार असा दावा करताना आपल्यालाच मतदार स्विकारतील, असा दावा केूला आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार आणि मतदार कोणाच्या बाजूने झुकणार याची उत्सुकता आहे.
तीनही विधानसभा मतदारसंघांत काँटे की टक्कर असून, कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा ठरले आहेत. दोन्ही मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार याचीच उत्सुकता राज्यस्तरावर लागून राहिली आहे. त्यामुळे कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीचा गड कोण राखणार, आणि काय चमत्कार घडणार. तुल्यबळ लढतींमध्ये वाढलेले मतदान, तरुणांच्या आणि महिलांच्या माध्यमातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कोणाच्या बाजूने झुकणार, हे उद्या, 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे.