
नागपूर : केंद्रातील भाजप,एनडीए सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने कधीही जात-पात बघून सेवाभावात बदल केला नाही. आयुष्यमान योजना वा लाडकी बहीण योजना असो; जात आणि धर्म बघून योजनांचा लाभ दिला गेला नाही. याउलट काँग्रेसने कायम जातीयवादाचे विष पेरले, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज रविवारी केली.पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, उत्तर नागपूरमध्ये डॉ. मिलिंद माने व पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे यांच्या प्रचारार्थ गडकरी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
गडकरी म्हणाले, ‘आमच्यासाठी राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे. आम्ही दलितांच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करण्यात आला. मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा दीक्षाभूमीचे काम बंद पडले होते. आमच्याच कार्यकाळात ते काम पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींशी संबंध असलेल्या चिंचोलीला महत्त्व प्राप्त करून दिले. कामठी येथील ड्रॅगन टेम्पल आमच्या काळात जागतिक आकर्षणाचे केंद्र बनले. कामठीतील मेट्रो स्टेशनला ‘ड्रॅगन टेम्पल स्टेशन’ असे नाव देण्याचा निर्णय झाला.’ कमाल चौकात माझ्या आईच्या नावाने डायग्नोसिस सेंटर सुरू केले जात आहे. त्याठिकाणी महागड्या तपासण्या अतिशय माफक दरात करून दिल्या जातील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
गडकरी म्हणाले, मी पालकमंत्री होतो तेव्हा मला इंजिनिअरिंग कॉलेज मिळाले होते. मात्र मी नाही घेतले. शिक्षकांचा अर्धा पगार घ्या, नोकरी लावून द्यायला पैसे घ्या अशा भानगडीत पडायचेच नव्हते. अनेक नेत्यांनी इंजिनियरिंग, डीएड-बीएड कॉलेज घेतले. माझ्या वाट्याला आलेले कॉलेज मी अंजूमन शिक्षण संस्थेला दिले. त्याठिकाणी हजारो मुस्लीम तरुण-तरुणी शिकलेत याचा गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.