खटाव : मतदारसंघात कॅनॉलचे वाहणारे पाणी, बागायती शेती आणि कारखान्यांची पेटलेली धुराडी पाहायचीत असा तीन ओळींचा अजेंडा घेऊन मी 2009 मध्येे माण-खटावच्या राजकारणात आलो. 15 वर्षे जीवापाड मेहनत करून माझा तो अजेंडा पूर्णत्वाला नेताना जनतेला दाखवलेले स्वप्न साकार करत आणले आहे. दुष्काळात पाण्याचे टँकर मागणारी येथील जनता आता हक्काने ऊस तोडायला टोळी मागू लागली आहे. मी आमदार होण्याचे फलित आता दिसायला लागले असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.गोंदवले गटाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याने प्रत्येक सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमत आहे. मायबाप जनता स्वयंस्फूर्तीने दुष्काळमुक्तीच्या लढ्याला साथ द्यायला मैदानात उतरत आहे. समोरची गर्दी पाहून माझ्या सारखा मीच भाग्यवान असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून माण- खटावच्या निवडणुकांमधील पक्ष आणि उमेदवार बदलले मात्र पाणीप्रश्न सोडवण्याचा जाहीरनामा बदलला नव्हता. 15 वर्षांपूर्वी मी दुष्काळमुक्तीचे स्वप्न दाखवून जनतेला साद घातली. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी खूप मोठा त्याग करत संघर्ष केला. उरमोडी, जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणले. ऊसाची बागायती शेती सुरु झाली. कारखाने सुरु झाले.
टेंभू योजनेची कामे सुरु झाल्याने दोन्ही तालुक्यातील 52 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागतोय. उत्तर माणमधील 32 गावांना पाणी पोहचायला सुरुवात झाली आहे. आज गोंदवले गटातील प्रत्येक गावात पाणी पोहचले तरी अंगात पाणी नसलेले विरोधक पाणी कुठे आहे असा प्रश्न विचारुन मूर्खपणा करत आहेत. मी 24 बाय 7 दुष्काळमुक्तीसाठी काम करत आलोय. आम्हाला दुष्काळी म्हणून हिणवले जायचे. तो दुष्काळी कलंकच येत्या 3 वर्षांत पुसून टाकतोय. पाणी आणण्याबरोबर गावागावात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. रस्त्यांचे जाळे विणले आहे. माझ्या मातीच्या स्वाभिमानाच्या तसेच दुष्काळ मुक्तीच्या लढाईत आडवे येणार्यांना आडवे करत माझी वाटचाल सुरुच राहणार आहे. विरोधकांची प्रत्येक विकासकामात आणि दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात खोडा घालायची प्रवृत्ती जनताच संपवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मला माझ्या कर्तृत्वामुळे भाजपने सन्मानाने पहिल्या यादीत विधानसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले. विरोधी महाविकास आघाडीत मात्र घोळात घोळ सुरू होता. उमेदवार इथला, मतदार इथले मात्र तिकीट ठरवण्यासाठी विरोधी टोळके बारामती, फलटणच्या सतरंज्या उचलत होते. मला रोखण्यासाठी बारामती, फलटण, कराड, अकलूजसह अनेक रथीमहारथी माण खटावमध्ये येत आहेत; मात्र मारून मुटकून उमेदवार केलेले प्रभाकर घार्गे निवडणूक का लढत आहेत, हे ते सांगू शकत नाहीत, असेही आ. जयकुमार गोरे म्हणाले.