अक्कलकोट/हंजगी : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले. काही अपवादत्मक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. लाडकी बहीण योजनेमुळे यंदा स्त्री मतदाराची संख्या दोन टक्के अधिक मतदान झाले आहे. याचा लाभ निश्चितच महायुतीला मिळणार असल्याची चर्चा तालुकावासीयांतून होत आहे.
भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी, काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातच लढत होत असून या उमेदवारासह रासपकडून सुनील बंडगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मल्लिनाथ पाटील, वंचित आघाडी कडून संतोषकुमार इंगळे यांच्यासह 12 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रात बंद झाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पूर्वी अक्कलकोट मतदारसंघ हा संवेदनशील मतदार संघ म्हणून गणला जायचा. 2019 मध्ये झालेली निवडणुक अत्यंत शांततेने पार पडली होती. यंदाही काही किरकोळ अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली. अक्कलकोट विधानसभेची निवडणूक ही कायमच भारतीय जनता पार्टी व काँग्रेस यांच्यातच लढत झालेली पाहायला मिळते. यंदाही खरी लढत भाजप व काँग्रेस यांच्यातच झाली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आपला उमेदवार निवडून यावा म्हणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्यक्ष जाऊन मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आलेे. काही बूथवर 90 पार केलेल्या वयोवृद्धांना व्हीलचेअरवर आणून मतदान करवून घेतलेे.
अक्कलकोट शहरातही सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. याकरिता दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 33 टक्के, दु.1 ते 3 वा. 47 टक्के, दुपारी 5 वाजता 58 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी पाच नंतर मतदानाची टक्केवारी वाढत जाऊन सुमारे 65 टक्के इतके मतदान होईल असा अंदाज आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात 3 लाख 83 हजार 479 मतदार असून यामध्ये पुरुष - 1 लाख 13 हजार 17 तर स्त्री - 1 लाख 11 हजार 237 मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे.