अमरावती : मतदान केंद्रावरून मतदानाच्या पेट्या नेत असताना अफरातफरीच्या संशयावरून बुधवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री गोंधळ उडाला. बडनेरा मतदारसंघातील गोपाल नगर स्थित राहुल गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळा येथील हा प्रकार आहे. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विविध पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून मत पेटीची अफरातफर होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला आहे.
या शाळेजवळ निवडणूक विभागाची गाडी येऊ शकत नव्हती. ती काही अंतरावर उभी होती. त्यामुळे मतपेट्या मतदान केंद्रावरून दुचाकीवर बसून नेण्यात आल्या. दरम्यानच शेवटची सीलबंद मतपेटी नेताना काही राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी आक्षेप घेतला आणि निवडणूक कर्मचार्यांना मारहाण केली. त्यामुळे तो कर्मचारी मतपेटी सोडून पळाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ अॅक्शन घेत या प्रकाराची शहानिशा केली. निवडणूक विभागाचे अधिकारी मतदान केंद्रांवर पोहोचले.
यावेळी बडनेरा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यासह प्रमुख पक्षाचे उमेदवार यांनाही मतदान केंद्रावर बोलाविण्यात आले. त्यांच्या हातून सर्व शहानिशा केल्यानंतर मतपेट्या निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. परंतु रात्री उशिरापर्यंत गोपाल नगरातील मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. राजापेठ पोलीस स्टेशन येथेही राजकीय पदाधिकारी व नेते पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत येथे तणाव कायम होता.