मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ठरवले जाईल आणि तेव्हाच्या राजकीय परिस्थितीच्या आधारे घेतला जाणारा निर्णय उपयुक्त ठरेल, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय पाहूनच मुख्यमंत्री निश्चित केला जाईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. मुख्यमंत्रिपदासाठी एखाद्या नव्या चेहऱ्याचाही विचार होऊ शकतो. यावेळी महायुतीला १६५ ते १७० जागा मिळून आमचे बहुमताचे सरकार येईल, असा दावाही त्यांनी केला.
तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महा महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पक्षाची भूमिका मांडत सस्पेन्स कायम ठेवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, असे विचारताच तावडे म्हणाले, याची चर्चा निवडणुकीनंतर करू, असे पक्षाने ठरविले आहे. निकाल आल्यानंतर एकत्र बसून जे ठरविले जाईल, त्याप्रमाणे सारेकाही होईल. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल किंवा बिहारनुसार समीकरण ठरवले जाईल. बिहारमध्ये आमचे आमदार जास्त असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
पक्षाने केलेल्या सव्र्व्हेनुसार, भाजपला ९५ ते ११०, शिवसेना ४० ते ५५ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २५-३० अशा एकूण १६५ जागा मिळतील आणि महायुतीचे बहुमताचे सरकार बनेल, असा दावाही त्यांनी केला. राज्यात महायुतीचे सरकार येऊन भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही सरकारमध्ये सामील होणार, या राज ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल विचारले असता तावडे म्हणाले, राज ठाकरे यांनी अनुभवाच्या आधारे विश्लेषण मांडले आहे. त्यांनी लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन प्रचारही केला होता. ते आमच्या गटाच्या जवळचे आहेत. महाराष्ट्रात १९६५ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एससी, एसटी, ओबीसी आदींना २९ टक्के आरक्षण दिले. १९८० मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मागितले. ते काँग्रेसच्या बाबासाहेब भोसले यांनी फेटाळून लावले. त्यानंतर मंडल आयोगातही मराठा समाजाला आरक्षण देता आले असते; पण ते शरद पवार आणि इतरांनी ते होऊ दिले नाही, असा आरोप तावडे यांनी केला.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा खूप आधी होते, ते तसे होतेच, असे नाही. कधी कधी रिपीटही होतात. तसे महाराष्ट्रात कोणी नवा चेहरा येईल किंवा रिपीटही होईल. राजस्थान, मध्य प्रदेशात केलेला प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो, असे सांगत तावडे यांनी सस्पेन्स वाढविला आहे.