

पुणे, पुढारी वृत्तसेवा : लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल अशा थेट लाभच्या योजनांमुळे महायुतीला फायदा होईल. शरद पवारांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. त्यांचे सरकार आले तर योजना बंद करतील. शरद पवारांच्या सभांचे नियोजन करणारे पावसाचे वातावरण पाहून करतात. त्यामुळे परिवर्तन वगैरे काहीही होणार नाही, असे भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आज (दि.१५) येथे सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते (Vinod Tawde) पुढे म्हणाले की, महायुतीची सत्ता आली तर मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही. 'बटेंगे तो कटेंगे' हे वास्तव आहे. विभागले तर इतरांचा फायदा होतो. एक है तो सेफ हे. असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत जाऊन बसली. त्यामुळे काँग्रेसबरोबर आघाडी करणे, जनतेला पटलेले नाही. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम परत आणण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ओबीसी समाजाला लोकसंख्यानुसार आरक्षण देणार असल्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे, ते उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. सामान्य मतदारांचे मत जाणून घेतले आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. वंचित, एमआयएम आणि बंडखोर यांच्यामुळे मतांचे विभाजन होईल, असे ते म्हणाले.