

धाराशिव - जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीमुळे काही मतदारसंघातील लढती रंगतदार होत आहेत. यात उस्मानाबाद तसेच उमरगा विधानसभेची निवडणूक लक्षवेधी होणार आहे. येथे विद्यमान आमदारांच्या विजयासाठी कार्यकत्यांची धावपळ सुरु आहे. तर विरोधी पक्षाकडूनही तगडे नियोजन केले जात आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. ज्ञानराज चौगुले हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी तिन्ही विजय शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढविले आहेत. तर चौथी निवडणूकही ते याच चिन्हावर लढवत असले तरी यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार प्रवीण स्वामी त्यांना लढत देत आहेत. स्वामी हे नवखे उमेदवार असल्याने त्यांच्यासाठी कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. पंधरा वर्षात केलेली विकासकामे व आणलेला निधी याच्या जोरावर आ. चौगुले मतदारांसमोर जात आहेत. प्रत्येक गावात केलेल्या विकासकामांचा पाढा त्यांचे कार्यकर्ते वाचून दाखवत आहेत. तर ठाकरे शिवसेनेत काही इच्छुक तसेच निष्ठावंतांनी अन्याय होत असल्याचे कारण देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे शिव सेनेत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. परिणामी स्वामी यांना प्रचारासाठी झगडावे लागत आहे.
तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळविलेले आ. कैलास पाटील या व ਨ ੀ दुसर्यांदा नशीब आजमावत आहेत. शिवसेनेतील बंडात सहभागी न होता त्यांनी निष्ठा दाखवत ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हीच बाब ते प्रत्येक गावात तसेच प्रचारादरम्यान सांगत आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती देण्यासाठी केलेले प्रयत्नही त्यांचे कार्यकर्ते मांडत आहेत. येथे विरोधातील उमेदवार शिवसेनेचे अजित पिंगळे हे भाजपचे तालुकाध्यक्ष होते. उमेदवारीसाठी रातोरात शिंदे सेनेत दाखल झाले. त्याअगोदर उमेदवारी मिळेल या खात्रीने कळंब मधील माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे या पक्षात आले होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
तर धाराशिव येथील सुधीर पाटील यांनाही शिवेनेने डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांत आहे. यामुळे पिंगळे यांना मोठी कसरत करावी लागत आहे.