
यवतमाळ : ज्या मुद्याचा महाराष्ट्राच्या निवडणूकीशी संबंध नाही, तो 370 कलमचा मुद्दा मलकापूरात गृहमंत्री अमित शहा काढतात. 370 कलमला विरोध करणाऱ्या काँग्रेस सोबत मी बसलो असा आरोप करतात. मात्र मी तुमच्यासोबत असतांना तुम्ही मला बाजूला केले. तुम्हीच मला काँग्रेससोबत बसण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.
आज किती शेतकरी आनंदी आहेत. सोयाबीनला भाव मिळतो का, कापसाची खरेदी केंद्रे सुरु झाली का, रोजगार, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला का, असे सवाल उध्दव ठाकरे यांनी केले. काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे. मात्र आज अदानीखेरीज किती जणांनी, किती जमिनी घेतल्या याची यादी अमित शहा यांनी प्रसिध्द करावी. दारव्ह्यातील झाशी राणी चौकातील मैदानावर उध्दव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
दिग्रस मतदारसंघाच्या विकासावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, याला मंत्री केले, त्याने दहा वर्षात आपल्या भागात कोणता विकास केला हे सांगावे. आपल्या मुलाला याने नोकरी लावली का, एमआयडीसीत एखादा उद्योग आणला का, रस्ते किती बांधले असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. मी कुणाच्या काळात कोणताही निधी अथवा विकास कामे अडविली नाही. मात्र तरीही महायुतीचे नेते स्थगीती सरकार असा माझ्यावर आरोप करतात. कोरोनाच्या काळात मी मंजूर केलेल्या कामांचेच नंतर यांनी उद्घाटन केले.
मुख्यमंत्री असतांना मी दिलेल्या निधीचे काय झाले, असा सवालही उध्दव ठाकरेंनी यावेळी केला. लाडक्या बहिणीसांठी आम्ही सुध्दा १५०० नव्हे तर ३००० रुपये महिना देउ. लाडक्या भावाच्या खात्यात 15 लाख का आले नाही, असा सवाल करीत उध्दव ठाकरे यांनी महायूतीच्या नेत्यांवर तोफ डागली. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.