कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चुरशीने बुधवारी 76 टक्के मतदान झाले. सातारा जिल्ह्यात कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक टस्सल आहे. मतदानातही ही टस्सल दिसून आली. भोसे, ता. कोरेगाव येथे मतदान करण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निढळ येथे व्हीव्हीपॅटचे मशिन बंद पडले. ते तत्काळ बदलण्यात आले. दिवसभर विविध गावांमध्ये मतदारांनी केंद्रावर रांगा लावल्याचे चित्र दिसले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी कार्यकर्ते घरटी जावून मतदार बाहेर काढत असल्याचे चित्र दिसले. यामुळे यंदा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे आ. महेश शिंदे व महाविकास आघाडीचे आ. शशिकांत शिंदे यांच्यात हायव्होल्टेज लढाई होत आहे. आपापले मतदार बाहेर निघावे, यासाठी दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते सकाळपासूनच कामाला लागले होते. कोरेगाव मतदारसंघात 365 केंद्रावर मतदान झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.93 टक्के, सकाळी 11 पर्यंत 21.24 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 38.29 टक्के, दुपारी 3 पर्यंत 53.86 आणि सायंकाळी 5 पर्यंत 69.61 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 76 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी थंडी असल्याने दुपारनंतर कोरेगाव शहरासह अनेक गावात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 35 ते 45 मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्या असल्याने तेथील मतदान सुरुच होते. भोसे येथील एका केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये मतदान करण्यावरून वादावादी झाली. मतदारसंघात मशिन्स संथगतीने चालत होत्या. तर कोठेही मशिन बंद पडण्याच्या घटना घडल्या नाहीत. सायंकाळी साडेसात वाजता संपूर्ण मतदानाची प्रक्रिया संपली. एकूण 76 टक्के मतदान झाले. सर्वत्र सुरळीत मतदान झाल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. महायुतीचे उमेदवार आ. महेश शिंदे व त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनी खटाव तर आ. शशिकांत शिंदे, पत्नी वैशाली शिंदे व कुटुंबियांनी ल्हासुर्णेत मतदानाचा हक्क बजावला.