

नांदगाव : कोविड काळात ज्यांनी खिचडी चोरली, राज्यात प्रेतं जळत असताना घरात बसून पैसे मोजण्याचे काम केले त्यांच्या मुखातून गद्दारीची भाषा शोभत नसल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला. महायुतीचे उमदेवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधली होती, आम्ही त्या शिवसेनेचा श्वास मोकळा केला. नांदगाव मतदारसंघांमध्ये येऊन आमदार सुहास कांदे यांच्या विषयी उलट सुलट बोलता, नको ती बदनामी करता, ज्यावेळी सुहास कांदे तुमच्यासोबत होता त्यावेळी चांगला होता आणि आता वाईट कसा? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत विरोधकांना सवाल केला . बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे प्रामाणिकपणे काम सुहास कांदे यांनी केले हे विसरून चालणार नाही. मनमाड करांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच मनमाड करांच्या घराघरात पाणी उपलब्ध होणार आहे. याचे यश सुहास कांदे यांचे आहे हे विसरून चालणार नाही याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास कांदे यांचे कौतुक करत सुहास कांदे एक नंबरचा आमदार असल्याचे सांगत कांदे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे सांगितले. सुहास कांदे यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून समज गैरसमज पसरवण्यात येत असले तरी सुहास कांदे यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. असे त्यांनी सांगितले.
सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतामधून मतदारसंघाच्या विकासामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची साथ मिळाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. तसेच मनमाड करंजवण पाणी योजने साठी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा त्यांच्याकडे चकरा मारून देखील फाईल पास केल्या जात नव्हती. शेवटी त्यांच्यासमोर फाईल फाडून फेकून दिली. मात्र शिंदे साहेब मुख्यमंत्री होताच दोन वर्षात मतदार संघाचा विकास करू शकलो. आणि शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी परत मला नांदगावकर मिळून देतील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार संजय पवार, राजेंद्र देशमुख शिवसेनेचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, अंजुमताई कांदे, साईनाथ गिडघे, साकोरा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य रमेश बोरसे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, माजी नगर अध्यक्ष राजेश कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे, विद्यमान सभापती सतीश बोरसे, विष्णू निकम, दर्शन आहेर, राजेंद्र पवार, भाजपचे दत्तराज छाजेड, गणेश शिंदे, यांच्यासह राजाभाऊ अहिरे, माजी नगर अध्यक्ष अरुण पाटील, माजी खासदार डॉ भारती पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधूकर हिरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.