डोंबिवली : निवडणुका झाल्या...मतदान झालं...विषय संपला...आता पाण्यासाठी झगडावे आम्हालाच लागणार, अशी परिस्थिती डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण पट्ट्यात निर्माण झाली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाण्याचे वितरण पुरेशा दाबाने सुरू होते. मात्र प्रचार संपून मतदान पाणी वितरणावर परिणाम झाला. सद्या पाण्याचा दाब कमी केल्याने गरजेपुरते देखिल पाणी मिळेनासे झाले आहे. परिणामी रहिवाशांत, विशेषतः गृहिणींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भात रहिवाशांनी समाज माध्यमांवर आपला रोष व्यक्त करताना प्रशासनासह राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचा खरपूस समाचार घेतला आहे. मतांपुरते मतलबी असल्याचा आरोप करत नेत्या/पुढाऱ्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. सदर गळती थांबविण्यासाठी एमआयडीसीकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शिवाय लाईनला छिद्रे पाडून त्याद्वारे पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर उपायोजना करण्यात एमआयडीसी प्रशासनाला अपयश येत आहे.
निवडणुकीत सर्व राजकिय पक्षांनी पाणी पुरवठ्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी आम्ही कशी केली आणि पुढे सर्वांना मुबलक पाणी मिळणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची पूर्तता होईल तेव्हा होईल. पण आत्तापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी गृहिणींकडून करण्यात येत असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.
निवासी आणि औद्योगिक परिसरात काही वर्षांपूर्वी मुबलक पाणी उपलब्ध असायचे. आता मात्र आमचे पाणी अन्यत्र ठिकाणी वळविले आहे का ? जर पाणी पुरवठा करण्याची क्षमता नसेल तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या महुमजली इमारतींना परवानगी देता कामा नये, याकडे मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांनी शासन/प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.