

ठाणे : ठाणे विधानसभा मतदार संघातून आमदार संजय केळकर यांना भाजपने तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेत नाराजी निर्माण झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू महिला आघाडी संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बंडाची तयारी सुरु केली. शिंदे यांनी मंगळवार (दि.22) उमेदवारी अर्ज घेतला असून केळकर यांच्याविरोधात लढण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजपा आमदार संजय केळकर यांनी 2014 मध्ये देखील शिवसेनेविरोधात निवडणूक लढवून भाजपचा कमळ ठाण्यात फुलविला होता. तेव्हापासून भाजप आणि शिवसेना हा संघर्ष सुरू झाला होता. पुन्हा 2019 मध्ये युती झाली आणि शिवसेनेला मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवाराचे काम करावे लागले होते. तेव्हाही काही नाराजी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याची चर्चा रंगली होती. त्याकडे दुर्लक्ष करीत आमदार केळकर यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयन्त सुरूच ठेवले.
पक्ष वाढीसाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही पंगा घेतला होता. अनेकदा ठाणे महापालिकेत शिवसेनेच्या भूमिकेला विरोधही केला होता. विधानसभेत ठाणे महापालिकेतील कारभाराचे लक्तरे काढली होती. शिवसेना-भाजपमधील संघर्ष सुरूच राहिला होता. त्यामुळे भाजपने विधानसभेचा उमेदवार बदलावा याकरिता प्रयन्त झाले. भाजपच्या इच्छुकांनी जोर लावूनही केळकर यांना तिसर्यांदा भाजपने उमेदवारी दिली. याबाबत मीनाक्षी शिंदे यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या आमदार संजय केळकर यांनी नेहमी माझ्या वॉर्डमध्ये विरोधात काम केले आहे. उबाठा गटाला मदत केली आहे. त्यांनी दहा वर्षात काय काम केले आहे की, आम्ही त्यांना मदत करू. त्यामुळे मी निवडणूक अर्ज घेतला असून 29 ऑक्टोबरपर्यन्त मुदत आहे, नंतर पाहू.