

डोंबिवली : 144 - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी 14 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. सोमवारी (दि.4) अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले. त्यामुळे या मतदार संघात आता 13 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
कल्याण विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 14 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केंद्रीय सर्वसाधारण निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांच्या उपस्थितीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर केली. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. भारतीय जन विकास आघाडीच्या उमेदवार उज्वला गौतम जगताप यांनी त्यांचा नामनिर्देशन अर्ज मागे घेतला. त्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभेच्या निवडणूक रिंगणात 13 उमेदवार आहेत. यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुभाष भोईर, शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेश गोवर्धन मोरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद उर्फ राजू रतन पाटील या तिघांत खरी लढत होणार आहे.
प्रमोद उर्फ राजू रतन पाटील - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दीपक दत्ता खंदारे - बहुजन समाज पार्टी
सुभाष गणू भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
राजेश गोवर्धन मोरे - शिवसेना (शिंदे गट)
विकास प्रकाश इंगळे - वंचित बहुजन आघाडी
हबीबुर्रहमान ओबेदुर्रहमान खान - पीस पार्टी
शिवा कृष्णमूर्ती अय्यर - अपक्ष
नरसिंग दत्तू गायसमुद्रे - अपक्ष
प्रियांका गजानन मयेकर - अपक्ष
दिपक रामकिसन भालेराव - अपक्ष
परेश प्रकाश बडवे - अपक्ष
चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष
अश्विनी अशोक गंगावणे - अपक्ष