नागपूर : विधानसभा निवडणूक मतदानानंतर मध्य नागपुरात बराच काळ तणाव होता. रात्री उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणात होती. महाल किल्ला रोड येथील मतदान केंद्रावरून ईव्हीएम नेत असताना कार्यकर्त्यांनी गाडी अडविली, झालेल्या दगडफेकीत तणाव वाढला. काँग्रेसचे काही कार्यकर्ते ताब्यात घेतल्याने कोतवाली पोलिस स्टेशनसमोर जमाव गोळा झाला. महाल, बडकस चौकात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काही वेळातच या परिसरात काँग्रेस भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. झेंडा चौक, कोतवाली, बडकस चौक परिसरात मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर आला. स्वतः पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल व वरिष्ठ अधिकारी आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
जमाव दूर करीत रस्ते मोकळे करण्यात आले. नाईक तलाव बांगलादेश परिसरात काँग्रेसतर्फे पैसे वाटपाच्या तक्रारीने दुपारी देखील वातावरण तापले.अखेर ते कार्यालय बंद करण्यात आले. भाजपचे आमदार प्रवीण दटके, काँग्रेसचे बंटी शेळके आणि हलबा समाजाचे अपक्ष लढत असलेले रमेश पुणेकर अशी तगडी लढत या मध्य नागपुरात आहे.
दोन दिवसांपूर्वी याच चौकात प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. दरम्यान, पूर्व नागपुरातील प्रशांत हायस्कूल हिवरी नगर मतदान केंद्रावर ईव्हीएम नेण्यापूर्वी सीसीटीव्ही बंद करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. लकडगंज पोलिस स्टेशनला देखील कार्यकर्ते धडकले. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दूनेश्वर पेठे यांची गाडी फोडल्याचा आरोप करण्यात आला. रात्रीपर्यंत या ठिकाणीही गोंधळाची स्थिती होती.याचप्रकारे जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून बोगस मतदानाच्या आरोपांनी भाजपा राष्ट्रवादीत वातावरण तापले.
पोलिस म्हणतात ईव्हीएम सुरक्षित!
मध्य नागपुरातील इव्हिएमची गाडी रोखणे, दगडफेक या घटनेचे व्हिडिओ समोर आले असून पोलिसांकडून या गाडीतील ईव्हीएम अतिरिक्त होते. मतदान झालेल्या ईव्हीएम सुरक्षित मतदान केंद्रावरच होत्या. त्या स्ट्राँग रमला सुरक्षित पोहोचल्या. गैरसमजातून हा गोंधळ वाढला असे सांगितले. भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले यामुळे हा गोधंळ झाला असे कोतवाली पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.