खेड : तालुक्यात बुधवारी (दि. 20) विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडताना सुसेरी गावातील एका मतदान केंद्रात मतदानासाठी गेलेल्या एका मतदाराला आपले नाव यादीतून डिलिट झाल्याचे समजताच धक्का बसला. त्यामुळे या मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस व प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली.
तालुक्यातील सुसेरी क्रमांक दोन या गावात जि.प. शाळेतील मतदार केंद्र क्रमांक 283 मध्ये सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. मात्र, गावातील सदाशिव नारायण कान्हाल या मतदाराचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा मुद्दा उपस्थित होताच दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय कदम, अनिकेत कदम यांच्यासह 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी मतदान केंद्र परिसरात गर्दी करत तेथील अधिकार्यांना धारेवर धरले.(Maharashtra assembly poll)
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्यानंतर मतदान केंद्र परिसरातील जमाव निघून गेला. या घटनेनंतर चौकशीची मागणी होत आहे.