संजय पाठक, सोलापूर
सोलापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना एका अपक्ष उमेदवारास पाठिंबा द्यावा वाटला. अर्थात, यामागे कारणे वेगवेगळी समोर येऊ शकतील; परंतु शिंदेंवर ही वेळ का यावी, हाच मुळी चर्चेचा मुद्दा आहे.
हसतमुख चेहरा, राजकारण्यांबरोबरच सांस्कृतिक विश्वातही मोठा मान असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. शिंदे यांनी कधीही कोणत्याही मतदारसंघात निवडणुकीस उभे राहावे व निवडून यावेच, अशी स्थिती. त्यांच्या पुढच्या पिढीबाबतही असाच काहीसा प्रकार.
शिंदेंवर प्रेम करणारा विविध क्षेत्रातील मोठा वर्ग सोलापूरमध्ये आजही आहे. असे असले तरी सोलापुरात शिंदे यांना स्वतःचा असा एखादा गट स्थापन करता आला नाही किंवा त्यांनी कधी एखादी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःचा एखादा हक्काचा असा मतदारसंघ बांधला नाही. यामागे त्यांची स्वतःची विचारसरणी काही असेल किंवा त्यांचा हेतू काहीही असेल; परंतु हे मात्र खरे की त्यांनी स्वतःची अशी ‘व्होट बँक’ निर्माण केली नाही. परंतु, या बरोबर हे ही त्रिवार सत्य आहे की, शिंदे यांनी सोलापूरच्या राजकारणात आपल्यानंतरची दुसरी फळी कधीच आकाराला येऊ दिली नाही.
एखादा स्थानिक राजकारणी थोडा नावारूपाला आला की त्याचा पद्धतशीरपणे काटा काढण्याचे काम शिंदे परिवाराकडून तर कधी त्यांच्या डाव्या-उजव्या कार्यकर्त्यांकडून झाले. याचा परिणाम असा झाला की, सोलापुरात काँग्रेस पक्ष म्हणावा तितका विस्तारला नाही. शिंदे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच शिंदे असे काहीसे स्वरूप शिंदेंनी स्वतःच्या राजकारणाचे करून ठेवले.
यातून शिंदे यांनी स्वतःचे महत्त्व अबाधित ठेवण्याबरोबरच दुसर्या फळीतील नेतृत्वाचा काटा काढण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही; परंतु असे करताना काँग्रेस पक्षाचे आपण नुकसान करत आहोत, आपल्यासाठी झटलेल्या विविध कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या राजकीय करिअरशी खेळ करत आहोत. हे त्यांच्या खिजगणतीतही नसावे का, हा प्रश्न उपस्थित होतो.
आसपासचे नेते, कार्यकर्ते खुजे राहतील याची काळजी घेताना शिंदे यांनी मुलगी खा. प्रणितीच्या राजकारणाचा मार्ग मात्र सुकर करण्याचा नेहमीच प्रयत्न केला, हे इतिहास सांगतो. प्रणितींच्या आमदारकीसाठी किंवा खासदारकीसाठी अगदी सकाळी सहापासून मध्यरात्रीपर्यंत ‘बॅक ऑफिस’ सांभाळत प्रणितींच्या प्रचाराची सर्व सूत्रे पद्धतशीरपणे हलवण्याचे, प्रसंगी राजकीय शत्रूंनाही जोडून घेण्याचे बेरजेचे राजकारण करण्याचे कसब वापरण्यात शिंदे यांनी कधीच कुचराई केली नाही. मात्र, हे करत असताना आपल्या पक्षातील, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल, त्याचे नुकसान होईल याचा कधीच विचार केला गेला नाही. अर्थात, यामुळे सोलापूरच्या राजकारणात शिंदे यांच्यानंतर दुसर्या फळीचे नेतृत्व कधीच निपजले नाही.
याचा परिपाक म्हणजे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना चक्क अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याची वेळ आली. खरे तर त्यांच्याकडे दुसऱ्या फळीतील नसले तरी तसे स्थानिक राजकारणातील चर्चेतील एक दोन चेहरे होते. त्यांना ते पक्षाचे अधिकृत तिकीट देत विधानसभा निवडणुकीत जिंकून आणू शकले असते. परंतु, वर उल्लेख केल्याप्रमाणे शिंदेंना दुसऱ्या फळीतील नेतृत्व मोठे होऊ द्यायचेच नसल्याने, किंवा खुजेच ठेवायचे असल्याने त्यांनी असे चर्चेतील चेहरे पद्धतशीरपणे बाजूला सारत तसा मवाळ, काँग्रेस विचारधारेचा; परंतु थेट काँग्रेसशी कनेक्ट नसलेल्या काडादी या अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला.