जळगाव : जिल्ह्यातील जळगाव शहर या विधानसभा क्षेत्रासाठी युतीचे भाजपाचे उमेदवार असलेले आमदार सुरेश भोळे (राजू मामा) वसूबारसच्या मुहूर्तावर आज सोमवार (दि.28) रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
गेल्या 10 वर्षापासून जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय झालेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना पुन्हा भाजपाने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे.
वसुबारसच्या शुभमुहूर्तावर सोमवार (दि.28) रोजी सकाळी १०. ३० वाजता आमदार राजूमामा भोळे हे उमेदवारी अर्ज भरणार असून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी ग्रामाविकासमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आरपीआयचे अनिल अडकमोल, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे तसेच राष्ट्रवादी (अजित दादा) शिवसेना (शिंदे गट) व महायुतीचे सर्व पदधिकारी नगरसेवक, महिला युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित राहणार आहेत.
शिवतीर्थ चौक व भाजपा कार्यालय (जी. एम. फाउंडेशन) पासनू नेहरू चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन टॉवर चौक, प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ वसंत स्मृती, भाजपचे जुने कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल. तहसील कार्यालयात आमदार सुरेश भोळे (राजु मामा ) हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.