

पुढारी ऑनलाईन डेस्कः
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी विधानसभा निवडणूकीसाठी वापरलेला निधी हा बिटकॉईन घोटाळ्यातील आहे. असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रविंद्र नाथ पाटील यांनी केला आहे. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाटील यांनी पुढे आरोप केला आहे की, क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून मिळालेली रोख रक्कम महाराष्ट्रातील सध्याच्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात वापरली जात आहे. तसेच मे मध्ये झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही अशीच हेराफेरी करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.
रविंद्रनाथ पाटील यांच्या म्हणन्यानुसार माजी पोलिस कमीशनर अमिताभ गुप्ता व सायबर क्राईम विभागातील तपास अधिकारी भाग्यश्री नवटाके यांचाही यात सहभाग आहे. त्यांच्या आरोपानुसार हे दोन अधिकारी या घोटाळ्यात अडकले होते पण या नेत्यांनी त्यांना संरक्षण दिले होते. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. समाज माध्यम एक्सवर त्यांनी पोस्ट लिहून या आरोपांचे खंडण केले आहे.
भाजपच्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्या म्हणाल्या की, सुधांशू त्रिवेदी यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप मी फेटाळून लावते. हे सर्व अनुमान आणि संकेत आहेत. मी भाजपच्या कोणत्याही प्रतिनिधीशी त्याच्या आवडीच्या वेळी आणि तारखेला सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहे.