

पिंपरी : महायुतीकडून अजित पवारांचा उमेदवार आणि त्यांच्याविरुद्ध चक्क भाजपसह जवळपास सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांचा उघडपणे पाठिंबा असणारा अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मावळ पॅटर्नच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते; मात्र महायुतीच्या सुनील शेळकेंनी चक्रव्यूह भेदून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा 1 लाखाहून अधिकच्या मताधिक्याने धक्का देत हा पॅटर्न निष्प्रभ ठरविलाच. शिवाय, मावळ मतदारसंघात सलग दुसर्यांदा विजयाचा झेंडा रोवला.
काँग्रेसचे प्राबल्य मोडीत काढल्यानंतर गेली सलग 25 वर्षे भाजपच्या ताब्यात असणार्या मावळ मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते सुनील शेळके यांनी बंडखोरी केली. तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढविली आणि भेगडेंचा पराभव केला. यानंतरच्या काळात अजित पवारांच्या अत्यंत जवळच्या आमदारांमध्ये शेळकेंचा उल्लेख होऊ लागला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या निकट असणार्या भेगडेंना हा पराभव जिव्हारी लागला. शेळके आणि भेगडे यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. गेल्या पाच वर्षांत अनेकदा या दोघांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्या.
भाजपकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह मावळ विधानसभेचे निवडणूक प्रमुख रवी भेगडेही इच्छुक होते. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बापूसाहेब भेगडे यांनीही तयारी सुरू ठेवली होती. मात्र, सुनील शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर हे सर्व नाराज एकत्र आले. विशेष म्हणजे गतवेळी सुनील शेळकेंच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती ते बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून शेळकेंच्या विरोधात दंड थोपटले. गतवेळचा वचपा काढण्यासाठी बाळा भेगडे यांनीही पक्षश्रेष्ठींचा आदेश असतानाही मागेपुढे न बघता थेट अपक्ष भेगडेंच्या मागे उघडपणे उभारण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनीही परिस्थिती लक्षात घेऊन संधी साधली आणि येथे आपला उमेदवारच न देता भेगडेंना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या उमेदवारासमोर भाजप नेत्यांचे व शरद पवार गटाचे समर्थन असल्याने मावळ पॅटर्न म्हणून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
शेळके आणि भेगडे यांच्यातील संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येऊन ठेपला होता. या दोघांमध्येच लढत होणार, हे स्पष्ट होत असतानाच अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेऊन महायुतीमध्ये प्रवेश केल्याने मावळमधील विधानसभेची गणिते बिघडली. निवडणुकीत एकमेकांविरोधात अपेक्षित असणारा संघर्ष महायुतीचे तिकीट खेचण्यासाठी सुरू झाला. 25 वर्षे भाजपची सत्ता होती, शेळकेही भाजपमध्येच होते. त्यामुळे स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी या मतदारसंघावर दावा केला. उमेदवारी न मिळाल्यास महायुतीचे काम न करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र, ज्याचा आमदार त्याची जागा या तत्त्वावर महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थात सुनील शेळके यांना सुटली आणि नाराज इच्छुकांकडून मावळ पॅटर्नला सुरुवात झाली.
राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंविरोधात माजी मंत्री मदन बाफना, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे आदी नेते उभे ठाकले असताना शेळकेंनी 1 लाखाहून अधिकच्या मताधिक्याने विजय खेचून आणत मावळ पॅटर्नच्या चर्चेला पूर्णविराम दिला. शेळके यांनी संपूर्ण मावळ तालुका पिंजून काढून लोकसंपर्क वाढविला होता. गेल्या पाच वर्षांतील हा लोकसंपर्क कामी आलाच शिवाय विकासकामे हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. लोणावळा ग्लास स्कायवॉक, उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय इमारती अशी कामे मार्गी लावलेली आहेत. त्यांना मतदारसंघातील महिलांचा वाढता पाठिंबा होताच, शिवाय लाडकी बहीण योजनेचा महायुतीने केलेल्या मुद्द्यांचाही त्यांना फायदा झाला.