

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार ॠतुराज पाटील यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. महिला, आबालवृद्धांसह अवघी तरुणाई आ. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकवटली होती. दसरा चौकापासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली तरी दसरा चौकात गर्दी होती.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार ॠतुराज पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरविले होते. त्यासाठी दसरा चौकामध्ये जमण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून कार्यकर्त्यांचे पाय दसरा चौकाकडे वळत होते. अकरा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण दसरा चौक कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.
फुलांनी सजविलेली वाहने सकाळपासून दसरा चौकात तयार ठेवण्यात आली होती. यामध्ये उमेदवार आमदार ॠतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, तसेच महाआघाडीतील मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी उभा होते. तिरंगी, भगवे, निळे-पिवळे ध्वज, पक्षाचे चिन्ह असणार्या टोप्या, स्कार्फ, फलक घेऊन भरउन्हात आबालवृद्ध कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग मिरवणुकीत होता.आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील आदींनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आमदार ॠतुराज पाटील यांनीही छत्रपती शाहूरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकातून रॅलीस सुरुवात झाली. हालगी, घुमक्याच्या तालावर तरुणाई मिरवणुकीच्या पुढे थिरकत होती. पक्षाचा तिरंगा हवेत डोलत होता. यावेळी देण्यात येणार्या घोषणांमुळे मिरवणुकीचा मार्ग दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर आ. ॠतुराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
रॅलीत आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, कॉम—ेड दिलीप पोवार व अतुल दिघे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सुनील मोदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आर. के. पोवार, शेकापचे बाबासोा देवकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, मल्हारसेनेचे बबन रानगे, विश्वविजय खानविलकर, बाजार समितीचे संचालक भरत पाटील, पूजा ॠतुराज पाटील, देवश्री सतेज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील, माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले, सुलोचना नाईकवडे आदी सहभागी झाले होते.