

संजय पाठक
Maharashtra Assembly Polls | सोलापूर जिल्हा हा महायुतीचा त्यातही भाजपचा बालेकिल्ला गणला जात असे. परंतु, मध्यंतरी राज्यात झालेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर हा जिल्हा नेमका कोणा एका पक्षाची जहागिरी, बालेकिल्ला राहिलेला नाही. सोयीस्कर मैत्री, शत्रुत्व आणि स्वार्थी आघाडी अन् बिघाडी अशा काहीशा वातावरणाने जिल्ह्यातील वातावरण पार गढूळ झाले आहे.
सोलापूर शहरालगतच्या तिन्ही मतदारसंघांत सध्या सावळागोंधळ दिसून येत आहे. त्यापैकी शहर उत्तरमध्ये आरंभी महायुतीच्या उमेदवारीवरून वादळ उठले होते. परंतु, आता सर्वकाही आलबेल आहे. या ठिकाणी महायुतीचे आ. विजयकुमार देशमुख विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांच्यात सामना रंगणार आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये यंदा मुस्लिम उमेदवार फारूक शाब्दी रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन नरोटे, माकपकडून माजी आ. नरसय्या आडम आणि भाजपकडून देवेंद्र कोठे रिंगणात आहेत.दक्षिण सोलापूर मतदारसंघात महायुतीकडून आ. सुभाष देशमुख यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अमर पाटील, माजी आ. दिलीप माने, धर्मराज काडादी प्रबळ दावेदार आहेत. या सर्वांनीच अर्ज भरले आहेत. अक्कलकोटमध्ये मात्र पारंपरिक महायुतीचे आ. सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध महाविकास आघाडीचे सिद्धाराम म्हेत्रे अशी दुरंगी लढत होत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपमधील माजी आ. प्रशांत परिचारक विरुद्ध आ. समाधान आवताडे यांच्यातील खदखद कमी करण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यावर डाव लावला आहे. मनसने या ठिकाणी युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा असलेले तसेच पक्षनेते राज ठाकरे यांचे किचन कॅबिनेट सदस्य रिंगणात उतरवले आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आ. राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीचे उत्तम जानकर असा सामना रंगणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या टोकाला असणार्या सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचे नेते आ. शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी भरली आहे. तसेच शेकापकडून ज्येष्ठ नेते (कै.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब निवडणूक रिंगणात आहेत. मराठवाड्याशी टच असलेल्या बार्शी मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे आ. राजेंद्र राऊत विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे माजी मंत्री दिलीप सोपल रिंगणात आहेत.
माढ्यात राजकीय पक्ष, उमेदवारांचा अक्षरशः राडा झाला आहे. विद्यमान आ. बबनदादा शिंदे व त्यांचे चिरंजीव, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यापूर्वी ते काही काळ अजित पवारांच्या, तर काही काळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. तरीही त्यांनी अर्ज मात्र अपक्ष भरला. त्यांच्याविरुद्ध साखरसम्राट अभिजित पाटील हा नवा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रिंगणात उतरवला आहे. महायुतीकडून या ठिकाणी माजी आ. धनाजी साठे यांच्या स्नुषा मीनल साठे यांना संधी दिली आहे.
करमाळ्यात विद्यमान आ. संजयमामा शिंदे हे तसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्के मित्र, तरीही त्यांनी महायुतीपासून अंतर राखत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी शिंदे शिवसेनेकडून नवा चेहरा दिग्विजय बागल यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आ. नारायण पाटील आखाड्यात उतरले आहेत.
बहुचर्चित ठरलेल्या व उमेदवार, एबी फॉर्मची अदलाबदलीने जिल्हाभर गाजलेल्या मोहोळ मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आ. यशवंत माने हे माजी आ. राजन पाटील यांच्या भरभक्कम पाठिंब्याने निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राजू खरे हा नवा चेहरा दिला आहे.