

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यात एकूण ३० गावांत ९३ मतदान केंद्रे आहेत. तर ६७,९८५ मतदार आहेत. त्यामुळे किती टक्के मतदान होते व कोणाला मताधिक्य मिळून आमदारकीची संधी मिळते. हे मतमोजणीदिवशी स्पष्ट होणार आहे. सोमवारी (दि.१८) प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. या मतदारसंघात एकूण सहा व मुख्यतः चार उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत दीपक केसरकर - राजन तेली यांच्यात अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात सर्वच पक्षांनी प्रचाराच्या रणधुमाळीत जोरदार आघाडी घेतली. सर्वच पक्षांनी शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. वेंगुर्ले तालुक्यात भाजपचे मोठे वर्चस्व आहे. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर वेंगुर्ले तालुक्यात शिंदे- शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी भाजप पाठोपाठ तालुक्यात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. तालुक्यात दोन मुख्य पक्ष व दोन अपक्ष यांनी प्रचारात आघाडी घेतली.
केसरकर यांच्या प्रचारार्थ खासदार नारायण राणे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रचार सभा घेतली. तर दोनच दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ले शहरात प्रचार सभा घेत विकास कामे, वचननामा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रचार बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे राजन तेली यांना किती मतदान मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी मात्र तालुक्यात केवळ एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. तर प्रत्येक गावात तसेच शहरात पदाधिकाऱ्यांमार्फत युवा वर्ग मार्फत प्रचार यंत्रणा राबवली आहे. तसेच दुसऱ्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनीही पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवत आपल्याला एक संधी द्यावी, असे मतदारांना आवाहन केले आहे.
वेंगुर्ले तालुक्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी आरोग्य सुविधा परिपूर्ण नाहीत. तालुक्याचा आणखी पर्यटनात्मक विकास होऊ शकतो. डीएड, बीएड, पदवीधर यांना नोकऱ्या प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. शहरात भरीव सुधारणा झाल्या असल्या तरी बहुतांशी ठिकाणचे रस्ते सुधारणे आवश्यक आहे. एकूणच वेंगुर्ले तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सुटून परिपूर्ण विकास होण्यासाठी योग्य उमेदवारला संधी देणे आवश्यक आहे.