मेढा : निवडणूक म्हटले की अनेकजण उगवतात. मात्र, पाच वर्षे त्यांना जनतेची आठवण नसते. सातारा-जावली मतदारसंघात मात्र आ. शिवेंद्रराजे यांच्या रूपाने जनतेला त्यांच्या हृदयातील आमदार मिळाला आहे. आता यावेळी त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करू. त्यांनी संपूर्ण मतदारसंघात निर्माण केलेला विकासाचा झंझावात विरोधकांना जागा दाखवून देईल, अशी ग्वाही खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ ता. जावली येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, माजी सभापती ह.भ.प. सुहास गिरी, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, गीता लोखंडे, रोहिणी निंबाळकर, जयदीप शिंदे, जितेंद्र शिंदे, राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, आपले कार्यसम्राट आमदार शिवेंद्रराजे यांनी सातारा-जावली मतदारसंघात एक विकासपर्व उभे केले आहे. या मतदारसंघात जेवढी विकासकामे झाली आहेत, तेवढी इतर कोणत्याही मतदारसंघात बहुदा झाली नसतील. आपल्या मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट होण्यासाठी शिवेंद्रराजेंशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. आपण सर्वांनी शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. त्यांना महाराष्ट्रात 1 नंबरचे मताधिक्ये देऊन इतिहास निर्माण करा. आ. शिवेंद्रराजे यांच्या पाठीशी सर्व जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे, असे मानकुमरे म्हणाले. यावेळी सौरभ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. दरम्यान, या सभेत दीपक पवार गटातील पवारवाडी येथील बहुतांश कार्यकर्त्यांनी तसेच खर्शी येथील कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून आ. शिवेंद्रराजेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, विरोधकांनी प्रतापगड कारखाना सुरु होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. आम्ही सर्वांनी मिळून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आणि जावलीतल्या शेतकर्यांच्या हक्काचा कारखाना सुरु केला. आज शेतकर्यांच्या उसाचा प्रश्न तर मिटलाच पण, बाजारपेठेत आर्थिक उलाढालीत वाढ झाली. आजूबाजूची हॉटेल्स सुरु झाली आणि या भागातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. कोणाची कसलीही समस्या असो ती मी सोडवतोच. विकासकामाबाबत सांगायला विरोधकांकडे काहीही नाही. एक काम सोडा पण, गेल्या पाच वर्षात जावलीतल्या एका तरी गावात हे विरोधक कधी फिरकले आहेत का? असा सवालही आ. शिवेंद्रराजेंनी केला.