

पालघर, पुढारी वृत्तसेवा : पक्षविरोधी काम केल्याबद्दल विक्रमगडचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम (Prakash Nikam) यांना शिवसेना पक्षाने निलंबित केले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेतून प्रकाश निकम यांचे निलंबन करण्यात आले असले तरी त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबतीत अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने निलंबन दाखवून थातूरमातूर कारवाई केली आहे का ? अशी चर्चा महायुतीच्या गोटात रंगत आहे.
शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रकाश निकम यांच्यासह जालन्याचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल व कन्नड तालुका प्रमुख चेतन राजे अशा तिघांचे निलंबन पक्षातून करण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यवर्ती कार्यालयाचे शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या सहीचे असलेले हे निलंबन प्रसिद्धपत्र समाज माध्यमांवर फिरत आहे. (Maharashtra Assembly Polls)
पालघर-बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजपाच्या बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. मात्र विक्रमगड येथील बंडखोर प्रकाश निकम यांनी आपला अर्ज कायम ठेवला होता. विक्रमगड मध्ये भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांना प्रकाश निकम डोईजड ठरणार आहेत. त्यामुळे भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बोईसर पालघरमध्ये शिवसेनेचा प्रचार न करण्याचे संकेत दिले होते व प्रकाश निकम यांच्या राजीनाम्यासह पक्षातून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपकडून जोर धरत होती. (Maharashtra Assembly Polls )
पालघरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पेटण्याची चिन्हे दिसत असताना भाजपची मागणी शिवसेनेने मान्य करत निकम यांना शिवसेनेतून निलंबित केले आहे. प्रकाश निकम हे शिवसेनेतूनच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले असले तरी अध्यक्षपदाबाबत शिवसेनेने अजूनपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे भाजपच्या मागणीनुसार शिवसेना पुढे यांच्या अध्यक्षपदाबाबत काय पावले उचलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.